नवी दिल्ली ः वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) घट केल्याने विविध मॉडेलनुसार कार आणि लक्झरी एसयूव्ही 65 हजार ते 8 लाख 90 हजार रुपयांनी स्वस्त होणार आहेत. तसेच, बीएमडब्ल्यू, मर्सिडिस बेंझच्या किमती मॉडेलनुसार 2 लाख 60 हजार ते 11 लाख रुपयांनी कमी होणार आहेत.
जीएसटी कौन्सिलने कारवरील कर 28 वरून 18 टक्क्यांवर आणला आहे. तसेच, लक्झरी वाहनांवरील कर 40 टक्के केल्यानंतर त्यावरील नुकसानभरपाई कर रद्द केला आहे. त्यामुळे सर्वच कारच्या किमतीत घट झाली आहे. नवीन दर येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
महिंद्रात 1.56 लाखांपर्यंत घट
महिंद्राने बोलेरो नीओ वाहनाची किंमत 1.27 लाख रुपयांनी कमी केली आहे. एक्सयूव्ही 3 एक्सओ पेट्रोल वाहनाची किंमत 1.40 आणि डिझेल वाहनाची किंमत 1.56 लाखाने कमी केली आहे. थार रेंज 1.35 आणि रॉक्सची किंमत 1.33 लाख रुपयांनी कमी झाली आहे. स्कॉर्पिओ क्लासिक 1.01, स्कॉर्पिओ एन 1.45 आणि एक्सयूव्ही 700 ची किंमत 1.43 लाख रुपयांनी कमी झाली आहे.
टाटा-टोयाटोच्या किमती घटल्या
टाटा मोटर्सने विविध श्रेणीच्या कारवर 1.45 लाखापर्यंत सवलत देऊ केली आहे. टियागो 75 हजार, टिगोर 80 हजार, अल्ट्रॉझ 1.10, पंच 85 हजार, नेक्सन 1.55 लाख, हॅरिअर 1.40 लाख, सफारी 1.45 लाख आणि कर्व्हची किंमत 65 हजार रुपयांनी कमी झाली आहे. टोयाटोने फॉर्च्युनरची किंमत 3.49 लाख, लिजेंडर 3.34 लाख, हायलक्स 2.52 लाख, वेलफायर 2.78 लाख आणि कॅमरीची किंमत 1.01 लाख रुपयांनी घटवली आहे.
इनोव्हा क्रिस्टावर 1.80 लाख आणि इनोव्हा हायक्रॉसची किंमत 1.15 लाख रुपयांनी कमी झाली आहे. रेनॉल्टच्या किगरची किंमत 96 हजार 395 रुपयांनी कमी होईल.
ह्युंदाईत 2.4 लाखांपर्यंत घट
ह्युंदाईच्या विविध कारची किंमत 2.4 लाख रुपयांपर्यंत कमी होणार आहे. ग्रँड आय 10 निओस 73 हजार 808, आय 20 ची किंमत 98 हजार 53, व्हर्ना 60 हजार 640, क्रेटा 72 हजार 145, क्रेटा एन लाईनची किंमत 71 हजार 762, अल्काझार 75 हजार 376 आणि टक्सनची किंमत 2.4 लाख रुपयांनी कमी होईल. निस्सान मोटार इंडियाने एमटी व्हिसियाची किंमत 6.14 लाखांवरून 5.61 लाख, एमटी व्हिसिया 6.64 वरून 6.07 लाख, एमटी एसेंटा 7.29 वरून 6.66 लाखांपर्यंत किमती कमी केल्या आहेत.
स्कोडाच्या किमती 5.7 लाखांपर्यंत खाली
स्कोडाच्या विविध श्रेणीतील वाहनांच्या किमती 5.7 लाख रुपयांपर्यंत कमी होतील. कोडियाकची किंमत जीएसटी कपातीमुळे 3.3 लाख रुपयांनी कमी होईल. तर, उत्सवासाठी कंपनीने अडीच लाख रुपयांची सवलत देऊ केली आहे. त्यामुळे कोडियाकची किंमत 5.8 लाख रुपयांनी कमी होणार आहे. कुशाकची किंमत जीएसटीच्या कपातीमुळे 66 हजारांनी कमी होईल. या वाहनावर उत्सवासाठी अडीच लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनाची किंमत 3.16 लाखांनी घटेल. स्लाव्हियाची किंमत जीएसटीमुळे 63 हजार रुपयांनी कमी होणार असून, उत्सवासाठी 1.2 लाखाची सवलत दिली आहे. परिणामी, वाहनाची किंमत 1.83 लाख रुपयांनी कमी होईल.
मारुती-सुझुकीची अपेक्षित कपात
मारुती सुझुकीने अधिकृतपणे कपात जाहीर केली नाही. मात्र, त्यांच्या वाहनांच्या किमती 2.25 लाख रुपयांपर्यंत कमी होतील, असा अंदाज आहे. त्यात अल्टो के 10 ची किंमत 40 हजार रुपये, वॅगन आर 57 हजार, स्विफ्ट 58 हजार, डिझायर 61 हजार, बलेनो 60 हजार, फ्रँक्स 68 हजार, ब्रेझा 78 हजार, इको 51 हजार, एर्टिगा 41 हजार, सेलेरियो 50 हजार, एस-प्रेसो 38 हजार, इग्निस 52 हजार, जिमनी 1.14 लाख, एक्सएल-6 ची किंमत 35 हजार आणि इन्व्हिक्टो 2.25 लाख रुपयांनी स्वस्त होण्याचा अंदाज आहे.
बीएमडब्ल्यू, मर्सिडिस बेंझ झाली स्वस्त
बीएमडब्ल्यूची विविध श्रेणीतील वाहने 8.9 लाखांपर्यंत स्वस्त होणार आहेत. एक्स 5 ची किंमत 1.003 कोटी रुपयांवरून 93.7 लाख रुपयांवर आली आहे. तर, एक्स 7 या वाहनाची किंमत 1.3 कोटीवरून 1.2 कोटी रुपयांवर आली आहे. मर्सिडिस बेंझच्या विविध श्रेणीतील वाहनांची किंमत 2.6 ते 11 लाख रुपयांनी कमी झाली आहे.
एस क्लास एस 450 4-मॅटिकची किंमत 11 लाख रुपयांनी, जीएलएस 450 डी एएमजी लाईन 10 लाख रुपये, जीएलई 450 4-मॅटिकची किंमत 8 लाख रुपयांनी स्वस्त होणार आहे. ई-क्लास एलडब्ल्यूबी 450 4-मॅटिक 6 लाख, जीएलसी 300 4-मॅटिकची किंमत 5.3 लाख, जीएलए 220 डी 4-मॅटिक एएमजी लाईनची किंमत 3.8 लाख रुपयांनी कमी झाली आहे. सी-300 एएमजी लाईनची किंमत 3.7 लाख आणि 200 डीची किंमत 2.6 लाख रुपयांनी स्वस्त होईल.