नवी दिल्ली : मे महिन्यात एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन १६.४ टक्क्यांनी वाढून २.०१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. रविवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. यापूर्वी, एप्रिलमध्ये जीएसटी संकलन २.३७ लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मे महिन्यात देशांतर्गत व्यवहारांमधून एकूण जीएसटी महसूल १३.७ टक्क्यांनी वाढून १.५० लाख कोटी रुपये झाला. तर आयातीतून जीएसटी संकलन २५.२ टक्क्यांनी वाढून ५१ हजार २६६ कोटी रुपये झाले.
मे महिन्यात एकूण केंद्रीय जीएसटी महसूल ३५ हजार ४३४ कोटी रुपये होता. राज्य जीएसटी महसूल ४३,९०२ कोटी रुपये होता आणि एकात्मिक जीएसटी संकलन १.०९ लाख कोटी रुपये होते. सेसमधून उत्पन्न १२ हजार ८७९ कोटी रुपये होते. मे २०२४ मध्ये जीएसटी संकलन १,७२,७३९ कोटी रुपये होते.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्यांनी कर संकलनात १७ टक्क्यांपासून २५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. तर गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या मोठ्या राज्यांनी ६ टक्क्यांपर्यंत वाढ दर्शविली आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान सारख्या काही राज्यांनी जीएसटी संकलनात सरासरी १० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.