प्रशांत वाघाये
नवी दिली : कामगार कायद्यांमध्ये शुक्रवारपासून नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्र सरकारने चार नवीन कामगार कायदे देशभरात लागू केले आहेत. स्वातंत्र्यानंतर कामगारांसाठी या सर्वात मोठ्या सुधारणा मानल्या जात आहेत. यामुळे आता फक्त एका वर्षानंतर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल. तसेच या कायद्यांमुळे ४० कोटींहून अधिक कामगार, मालक आणि कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा, वेळेवर वेतन आणि सुरक्षित कामाची हमी दिली जाईल. व्यवसाय करण्याची सोय आणि नियमांचे सरळीकरण हे उद्योगांसाठी एक मोठे पाऊल ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाचे वर्णन कामगारांसाठी ऐतिहासिक म्हणून केले आहे. तर कामगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, या सुधारणा केवळ बदल नाहीत तर कामगारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आहेत.
आता एक वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी
नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर कामगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, नवीन कामगार कायद्याअंतर्गत, सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतन, तरुणांना नियुक्ती पत्रे, महिलांना समान वेतन आणि सन्मानाची हमी आणि ४० कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी दिली जाईल. नवीन कामगार संहितेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना आता फक्त एका वर्षानंतर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल. हा लाभ निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी असून पूर्वी पाच वर्षांनी ग्रॅच्युइटी दिली जात होती.
याव्यतिरिक्त ४० वर्षांवरील कामगारांसाठी वार्षिक मोफत आरोग्य तपासणी, ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतन, धोकादायक कामांमध्ये असलेल्यांसाठी १००% आरोग्य सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सामाजिक न्यायाची हमी कामगारांसाठी लागू करण्यात आली आहे. मंत्री मांडविया यांनी सांगितले की, २०४७ पर्यंत स्वावलंबी भारत आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.
कामगारांसाठी ऐतिहासिक दिवस - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, माझ्या कामगार बंधू आणि भगिनींसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. आमच्या सरकारने चार कामगार कायदे लागू केले आहेत. स्वातंत्र्यानंतर कामगारांच्या हितासाठी करण्यात आलेली ही सर्वात मोठी सुधारणा आहे. त्यामुळे कामगारांना सक्षम बनवले जाईल, व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन मिळेल, कामगारांसाठी सुरक्षित कामाची ठिकाणे, वेळेवर वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित होईल. महिला आणि तरुणांना या बदलाचा विशेष फायदा होईल. या सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला नवीन चालना मिळेल. येत्या काळात नवीन रोजगाराच्या संधी वाढवतील आणि विकसित भारताकडे देशाच्या प्रवासाला गती देतील.
नवीन कामगार संहितेच्या अंमलबजवणीमुळे काय बदल होतील?
•कंपन्यांच्या मानव संसाधन धोरणांमध्ये बदल होतील
•कर्मचारी पीएफ, ईएसआयसी आणि ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठे बदल होतील
•कामाचे तास, सुट्ट्या आणि सुरक्षा मानकांमध्ये एकरूपता येईल
•कामगार संहितेतील या बदलामुळे भविष्यात कामगार अधिक संघटित, सुरक्षित आणि उत्पादक होईल