दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकारचे मोठे गिफ्ट  Pudhari Photo
राष्ट्रीय

दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकारचे मोठे गिफ्ट

महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ; तीन महिन्यांची थकबाकीही मिळणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर बुधवारी (दि.16) मोठी भेट दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत ३ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या वाढीमुळे मूळ वेतनाचा भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के झाला आहे. त्यामुळे सणासुदीच्या आधी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. यासोबतच केंद्र सरकारने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर केली. यामध्ये मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ३०० रुपये, गहू १५० रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. सुमारे ४९.१८ लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि ६४.८९ लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. डीए आणि एमएसपी वाढीचा आगामी राज्य निवडणुकांशी संबंध नसल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

रब्बी हंगामातील सहा पिकांची एमएसपी जाहीर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, गहू, जव, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडई या रब्बी हंगामातील सहा पिकांची किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना खर्चापेक्षा जास्त एमएसपी देऊन गव्हावर १०५ टक्के वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले. २०२५-२६ या वर्षासाठी गव्हाच्या लागवडीचा खर्च अंदाजे ११२६ रुपये प्रति क्विंटल आहे. तर सरकारने गव्हाची खरेदीसाठी २४२५ रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी निश्चित केली आहे. सरकारने गेल्या वर्षीच्या तुलनेत एमएसपीच्या दरात प्रति क्विंटल १५० रुपयांची वाढ केली आहे. त्याचप्रमाणे जव १९८० रुपये, हरभरा ५६५० रुपये, मसूर ६७०० रुपये, मोहरी ५९५० रुपये आणि करडईसाठी ५९४० रुपये एमएसपी निश्चित करण्यात आला आहे.

काशीमध्ये गंगेवर आणखी एक पूल बांधण्यात येणार

काशी आणि पंडित दीनदयाळ यांना जोडण्यासाठी गंगा नदीवर आणखी एक पूल बांधण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री म्हणाले की, हा नवीन पूल रेल्वे आणि रस्ता दोन्हीसाठी असेल. रेल्वेसाठी चार पदरी, तर रस्त्यासाठी सहा पदरी असणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी २ हजार ६४२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पुलाच्या बांधकामासाठी ४ वर्ष कालावधी लागणार आहे. सध्या काशी आणि पंडित दीनदयाळ यांना जोडणारा मालवीय पूल आहे. जो १३७ वर्षे जुना आहे. त्याचे आयुर्मान संपले आहे. पण चांगल्या देखभालीमुळे तो अजूनही वापरात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT