नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनूसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि इतर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याचा आरोप काँग्रेसने केला. भाजप सरकारच्या कृतींमुळे तरुणांच्या शैक्षणिक संधींवर गंभीर परिणाम झाला आहे असा आरोप पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. खर्गे यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये राज्यसभेतील प्रतिसाद आणि अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधील सरकारी आकडेवारीचा हवाला देऊन गेल्या दशकात शिष्यवृत्ती लाभार्थ्यांमध्ये घट झाल्याचे अधोरेखित केले आहे. त्यांनी असा दावा केला की, निधीमध्ये दरवर्षी सरासरी २५ टक्के कपात करण्यात आली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेवर टीका केली. ही घोषणा दुर्बल घटकांच्या आकांक्षांची थट्टा करणारी असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत देशातील दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना संधी मिळत नाहीत आणि त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन दिले जात नाही, तोपर्यंत आपण आपल्या देशातील तरुणांसाठी नोकऱ्या कशा निर्माण करू शकू? असा सवाल त्यांनी केला आहे.