Government official's wife ghost salary:
जवळपास दोन वर्षे एकदाही ऑफिसला न जाता तब्बल दोन कंपन्यांकडून ३७.५४ लाख पगार मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यावेळी राजस्थानच्या उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल झाल्यावर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
प्रद्युमन दिक्षित हे राजस्थानच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागात सह संचालक म्हणून काम करतात. त्यांना त्यांची पत्नी पूनम दिक्षित यांच्यामार्फत बेकायदेशीररित्या पगार मिळत राहिला. हा पगार त्यांना दोन खासगी कंपन्यांमार्फत मिळत राहिला. या दोन कंपन्यांमध्ये पूनम या कमा करतात असं दाखवण्यात आलं होतं.
पूनम दिक्षित यांना ऑरिअनप्रो आणि ट्रीजेन सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीतून पगार मिळत होता. या दोन कंपन्यांना सरकारी कंत्राटं देखील मिळत होती.
या संपूर्ण प्रकरणात आता राजस्थान उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी ६ सप्टेंबरला अँटी करप्शन ब्युरोला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या वर्षी ३ जुलै रोजी अँटी करप्शन ब्युरोनं याबाबत चौकशी करण्यास सुरूवात केली.
तपासात असं दिसून आलं की टेंडर पास करण्याच्या बदल्यात प्रद्युमन यांनी ऑरिअनप्रो सोल्युशन आणि ट्रीजन सॉफ्टवेअर लिमिटेड कंपन्यांना त्यांच्या पत्नीला पगारी कर्मचारी म्हणून घेण्यास सांगितलं होतं. त्यांच्या पत्नीला महिन्याला पगार मिळत होता.
अँटी करप्शन ब्युरोच्या तपासात आढळून आलं की ऑरिअनप्रो सोल्युशन आणि ट्रीजन सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपन्या पूनम दिक्षित यांच्या वैयक्तिक बँक अकाऊंटमध्ये पगार जमा करत होते. हा पगार त्यांना जानेवारी २०१९ आणि सप्टेंबर २०२० पर्यंत जमा केला. एकूण रक्कम ही ३७ लाख ५४ हजार ४०५ रूपये पगार जमा करण्यात आला.
या दरम्यान, पूनम दिक्षित यांनी एकदाही दोन्ही कंपन्यांच्या ऑफिसमध्ये साधी भेट देखील दिलेली नाही. प्रद्युमन दिक्षित हे स्वतः आपल्या पत्नीची खोटी हजेरी लावत होते. एसीबीनं याबाबत सांगितलं की, पूनम दिक्षित यांना दोन कंपन्यांकडून पगार मिळत होता. त्या ऑरिअनप्रो सोल्युशनच्या कर्मचारी आहेत असं दाखवण्यात आलं होतं तर ट्रीजन सॉफ्टवेअर कंपनीत त्या फ्रीलान्सिंग करत असल्याचा बनाव करण्यात आला होता.