पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर प्रति लिटर २ रुपयांनी वाढवला आहे. वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा वाढीव अबकारी कर ८ एप्रिल २०२५ पासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने इंधनांवरील अबकारी करात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर केंद्र सरकारने खुलासा केला आहे. "सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी कळवले आहे की आज अबकारी करात वाढ झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही," अशी माहिती भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने X वर पोस्ट करत माहिती दिली आहे.
या आदेशानुसार, पेट्रोलवरील अबकारी कर आता प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील अबकारी १० रुपये करण्यात आला आहे.