Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: एका अश्लील व्हिडिओने १२ वर्षांच्या मुलाला बनवलं 'हैवान'; ९ महिन्यांच्या बाळावर केला अमानुष अत्याचार

एका १२ वर्षांच्या मुलाने अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. 'पॉर्न'च्या आहारी गेल्याने मुलांवर काय परिणाम होतो, याबात तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crime News

गोरखपूर: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. १२ वर्षीय मुलाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने अत्याचारापूर्वी गोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहिल्याची माहिती समोर आली असून, या घटनेनंतर अल्पवयीन मुलांमध्ये अश्लील साहित्याच्या वाढत्या संपर्काबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पीडित बालिका आपल्या आईजवळ झोपलेती असताना आरोपीने तिचे अपहरण केले. त्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिला गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत तिथेच सोडून पळ काढला. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर सुमारे ५०० मीटर अंतरावर शेतातील शेडजवळ ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपी हा पीडित कुटुंबाचा नातेवाईक असून काही दिवसांपूर्वीच चंदीगडहून येथे आला होता. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने अश्लील व्हिडिओ पाहिले होते आणि घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता, अशी धक्कादायक कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

लहान वयात अश्लील साहित्याचा मेंदूवर कसा होतो परिणाम?

अल्पवयीन मुलांमधील 'पॉर्न'च्या वाढत्या आहारी जाण्याच्या सवयीवर मानसोपचारतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या मनावर अश्लील साहित्याचा कसा परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांच्यात हिंसक प्रवृत्ती कशी निर्माण होऊ शकते, याबाबत नोएडा येथील 'हेडस्पेस हीलिंग'च्या संस्थापक आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. जया सुकुल यांनी 'मनीकंट्रोल' या वृत्तसंस्थेला माहिती दिली.

डॉ. जया सुकुल यांनी सांगितले की, "मुलांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो, त्यामुळे त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवणे जमत नाही. अशा कोवळ्या वयात अश्लील व्हिडिओ पाहिल्याने त्यांच्या मानसिकतेवर आणि मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर अत्यंत घातक परिणाम होतो." त्या पुढे म्हणाल्या, "१२ वर्षांच्या वयात मुले वास्तव आणि काल्पनिक गोष्टींमधील फरक समजू शकत नाहीत. यामुळे त्यांच्या मनात प्रेमाऐवजी हिंसक प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. भविष्यात अशी मुले नैराश्य, अपराधीपणाची भावना आणि मानसिक आजारांना बळी पडू शकतात."

पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला

या समस्येपासून मुलांना वाचवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पालकांनी इंटरनेटवर मुलं काय पाहतात याकडे लक्ष ठेवले पाहिजे. तसेच योग्य वयात मुलांना लैंगिक शिक्षण, कोणाचीही संमती असण्याचे महत्त्व आणि दुसऱ्यांच्या सीमांचा आदर करणे, या गोष्टी योग्य संवादातून समजावून सांगितल्या पाहिजेत; जेणेकरून मुले चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT