पुढारी ऑनलाईन डेस्क: Meteorological Olympiad | भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आपला 150 वा वर्धापन दिन वर्षभर साजरा करत आहे. यानिमित्त हवामान विभागाकडून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने आज (दि.३०) एक्स (X) पोस्टच्या माध्यमातून दिली.
हवामानशास्त्र विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपण हवामान आणि हवामानाच्या रहस्यांबद्दल उत्सुक आहात? ही तुमची चमकण्याची संधी आहे. हवामानशास्त्र विभागाने १५० व्या वर्षात प्रवेश केला आहे, यानिमित्ताने इयत्ता ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड (मेट-ऑलिंपियाड) आयोजित करण्यात आले आहे. "एका आकर्षक ऑनलाइन चाचणीमध्ये स्पर्धा करा, तुमचे हवामानशास्त्राचे ज्ञान दाखवा आणि अप्रतिम बक्षिसे जिंका!" असे देखील म्हटले आहे.
IMD ने म्हटले आहे की, "राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धेत ₹25,000 पर्यंत आकर्षक बक्षिसे!, नवी दिल्लीतील प्रतिष्ठित राष्ट्रीय-स्तरीय कार्यक्रमाचा भाग व्हा!, IMD च्या 150 व्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागी होण्याची अनोखी संधी मिळवा!, स्पर्धेतील विजेते आणि त्यांच्या पालकांसांठी प्रवास आणि अन्य सोयीसुविधा, मोफत नाव नोंदणी!
हवामान विभागाकडून आयोजित राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी रविवार १ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. मंगळवार १० डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. डिसेंबरच्या १४ आणि १५ तारखेला राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा होणार आहे.
राष्ट्रीय हवामान ऑलिम्पियाड स्पर्धेचा अभ्याक्रम, अभ्यास साहित्य आणि नावनोंदणी संदर्भातील अधिक माहितीसाठी https://mausam.imd.gov.in/met-oly/. या वेबसाईटवर भेट द्या.