US government shutdown | शटडाऊनमुळे सोने, चांदीचे भाव उच्चांकी स्तरावर Pudhari File Photo
राष्ट्रीय

Gold Silver Price | शटडाऊनमुळे सोने, चांदीचे भाव उच्चांकी स्तरावर

अमेरिकन फेडरलच्या व्याजदर कपातीच्या शक्यतेचाही परिणाम

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोमवारी, सोन्याच्या वायदा दरात 1.6 टक्के (1,962) वाढ होऊन ते प्रति 10 ग्रॅम 1,20,075 या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,18,113 वर बंद झाला होता. अमेरिकेतील सरकारी कामकाज बंद (शटडाऊन) आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याच्या वाढत्या अपेक्षेमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत वायदे बाजारात डिसेंबर डिलिव्हरीच्या करारांमध्ये मोठी वाढ दिसून आली.

फेब्रुवारीच्या करारांनीही सलग सातव्या सत्रात वाढ कायम ठेवली. सोमवारी हा भाव 1.7 टक्के (2,032) वाढून प्रति 10 ग्रॅम 1,21,365 वर पोहोचला. शुक्रवारी हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,19,333 वर बंद झाला होता. वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, सध्या सुरू असलेल्या अमेरिकन सरकारी शटडाऊनमुळे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे सुरक्षित मालमत्तेची मागणी वाढली आहे, ज्यामुळे चांदीचा भाव प्रति औंस 48.3 च्या वर गेला आहे. गेली पाच वर्षे चांदीच्या पुरवठ्यात सातत्याने तूट राहिली आहे, ज्याला वाढत्या औद्योगिक मागणीची जोड मिळाल्याने बाजारातील एकूण सकारात्मक भावनांना मोठी चालना मिळाली आहे.

मौल्यवान धातू सुरक्षित गुंतवणूक

बाजार विश्लेषकांच्या मते, वॉशिंग्टनमधील अर्थसंकल्पावरील वादामुळे प्रमुख सरकारी कार्यक्रम थांबले आहेत आणि महत्त्वाची आर्थिक आकडेवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी जोखीम टाळली असून त्यांचा कल मौल्यवान धातूंकडे वाढला आहे.सोने हे एक सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जाते. जेव्हा इतर गुंतवणुकीत जोखीम वाढते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. विशेषतः भू-राजकीय अस्थिरता, बाजारातील चढ-उतार आणि चलनांचे अवमूल्यन या काळात सोन्याच्या दरात वाढ होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT