नवी दिल्ली : गत वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वाढलेल्या किमतीचा फायदा घेण्यासाठी सुवर्ण तारण कर्जाकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. नोव्हेंबर 2025 अखेरीस सुवर्ण तारण कर्जात तब्बल 125 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
वाहन कर्जाच्या मागणीत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) कपात झाल्यानंतर वाहन विक्री वाढल्याने कर्ज वितरणातही दोन अंकी वाढ नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये उत्सवी मागणी संपल्यानंतर फ्रिज, वॉशिंग मशिन यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर घेतलेले कर्ज वितरण घटले आहे. गेल्या सहा महिन्यांत सुवर्ण तारण कर्जात जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे ‘आरबीआय’च्या अहवालावरून दिसून येत आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये सुवर्ण तारण कर्जाची थकबाकी 898 कोटी रुपये होती. त्यात नोव्हेंबर 2024 पर्यंत 1 लाख 59 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. तर, नोव्हेंबर 2025 पर्यंत कर्जाचा आकार 3 लाख 50 हजार कोटी रुपयांवर गेला आहे.
कमीत कमी कागदपत्रे आणि कमी कालावधीत कर्ज हवे असल्यास सोने तारणाचा पर्याय उत्तम आहे. लघू उद्योजकांना हवे असलेले खेळते भांडवल, घरगुती अडचणीच्या कालावधीत लागणाऱ्या पैशांसाठीदेखील सुवर्ण तारण कर्जाचा पर्याय स्वीकारला जात आहे. कर्जदार आणि कर्ज वितरण करणाऱ्यांसाठी सोने तारण समान स्वरूपात फायदेशीर ठरत असल्याचे ‘आयएफएल कॅपिटल’च्या सुवर्ण कर्ज विभागाचे प्रमुख मनीष मयंक म्हणाले.
गृह कर्ज वितरण वार्षिक 9.8 टक्क्यांनी वाढून 31.9 लाख कोटी रुपयांवर गेले
नॉनबँकिंग फायनान्स कंपन्यांना (एनबीएफसी) दिलेले कर्ज वितरण 9.5 टक्क्यांनी वाढून 17.2 लाख कोटी रुपयांवर
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘एनबीएफसी’ला दिलेल्या कर्जात 10.9 टक्के वाढ झाली होती. यंदा वाढीची गती मंदावली
व्यापारासाठी दिलेले कर्ज वितरण 14 टक्क्यांनी वाढून 12.3 लाख कोटी रुपयांवर
केंद्र सरकारकडून निर्यातदारांच्या कर्ज वसुलीला स्थगिती. अमेरिकेने लागू केलेल्या 50 टक्के शुल्कवाढीमुळे निर्यातदार अडचणीत
देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1 लाख 35 हजार रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सोने तारण कर्ज वितरणात वाढ झाली आहे.- मनीष मयंक, सुवर्ण कर्ज विभागप्रमुख, ‘आयएफएल कॅपिटल’