जळगाव : येथील सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी घटस्थापनेदिवशी केलेला उच्चांक दुसर्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मोडीत निघाला. सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम 1,339, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 1,030 रुपयांची वाढ नोंदवली गेली.
सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम एक लाख 15 हजार 978 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच 1,339 रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याच्या दराने एक लाख 17 हजार 317 रुपयांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. सुवर्ण बाजारपेठेत एक सप्टेंबरला सोन्याचे दर एक लाख 8 हजार 459 रुपयांपर्यंत होते. त्यानंतर कमी-अधिक फरकाने सातत्याने दरवाढ सुरूच राहिल्याने तीन आठवड्यांच्या कालावधीत सोन्याच्या किमतीत तब्बल 8,850 रुपयांची वाढ झाली.
शहरात सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख 38 हजार 20 रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. मंगळवारी सकाळी बाजार उघडताच त्यात 1,030 रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीच्या दराने जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख 39 हजार 50 रुपयांच्या नव्या उच्चांकावर झेप घेतली. एक सप्टेंबरला एक लाख 28 हजार रुपयांपर्यंत असलेल्या चांदीच्या दरातही तीन आठवड्यांत 11 हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
सोन्याच्या किमती वाढवणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे, गुंतवणूकदार आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावर खरेदी. देशोदेशीच्या मध्यवर्ती बँकांकडून त्यांच्या साठ्यात सोन्याची वाढ केली जात आहे. यामुळे जागतिकस्तरावर सोने-चांदीची मागणी लक्षणीयरीत्या वाढली असून, किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
सणासुदीच्या काळात नेहमीप्रमाणे सोन्याची मागणी वाढते. मात्र, वाढलेल्या दरांमुळे अनेक ग्राहक जुने दागिने बदलून नवीन नक्षीचे दागिने घेण्याला प्राधान्य देऊ शकतात. सराफांच्या मते, दर कितीही जास्त असले तरी विक्रीचे एकूण मूल्य वाढणारच आहे.
सोने : 1,17,700 प्रतितोळा
चांदी : 1,40,000 प्रतिकिलो (सोने-चांदी दर जीएसटीसह)