विजय जाधव
तिरुवनंतपूरम : गोव्याच्या राजकारणात तत्त्वनिष्ठ राहून राष्ट्रवादी विचारधारेचा आग्रह धरणारे राजेंद्र आर्लेकर केरळमच्या राजभवनात रमले आहेत. घटनात्मक जबाबदारी सांभाळत त्यांनी या राजभवनाला आपल्या उपक्रमशीलतेने खऱ्या अर्थाने लोकभवनाचा आकार दिला आहे.
आर्लेकर गेली ३७ हून अधिक वर्षे गोव्याच्या राजकारणात सक्रिय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या आर्लेेकर यांनी त्याला समाजकारणाची आणि त्यातून ही सेवा देव, देश आणि धर्मासाठी अर्पण केली, हे सर्वश्रुत आहे. भारतीय जनता पक्षाने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एका रात्री फोन करून तुम्हाला आम्ही राज्यपाल करत आहोत, असा निरोप दिला आणि ते या नव्या घटनात्मक जबाबदारीवर पदसिद्ध झाले.
हिमाचल प्रदेश २०२१-२३, बिहार २०२३-२५ या राज्यांची राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली. सामान्य कार्यकर्त्याला ही संधी देत पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांची कदर केली जात असल्याचा संदेश पक्षाने तळागाळातल्या फळीला दिला. जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्यावर केरळमची जबाबदारी सोपवण्यात आली. सध्या ते केरळमसोबतच तामिळनाडूच्या या पदाचा कार्यभार पाहतात. केरळममध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेले सत्तांतर, तामिळनाडूतील मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाने केलेली सत्ता स्थापना या सर्व प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींत त्यांनी घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवत, त्याचबरोबर समन्वयाची भूमिका घेत फारसे न ताणता लोकशाही सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा केला. १ जानेवारी २०२५ पासून ते केरळममध्ये कार्यरत आहेत. मार्च २०२६ पासून तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे.
केंद्रीय पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या केरळम माध्यम दौऱ्यात राज्यपाल आर्लेकर यांच्याशी राज्यपाल भवनात संवाद साधला. उत्सुकता होती ती गोव्याचा हा भूमिपुत्र या द्रविडी राजकारणाचा आणि विशेषतः डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या त्रावणकोरच्या मातीत एकरूप झाला आहे, हे जाणून घेण्याची. साधारणतः, दीड तासाच्या संवादात त्यांच्यातील कौशल्याचे, त्यांच्या राजकीय अनुभवाचे दर्शन घडले. केरळमच्या प्रश्नांवर त्यांनी समन्वय आणि सल्लागाराची भूमिका घेतली आहे. केंद्र आणि राज्यांमधील गुंतागुंत ते चातुर्याने सोडवताना दिसतात. त्यांच्या बोलण्यात डाव्या राजवटीचा आणि आताच्या काँग्रेस डाव्यांच्या सत्तेबद्दलचा दुस्वास दिसत नाही. उलट सकारात्मक राहून या लोकभवनाला अधिक लोककेंद्री केले आहे.
मराठी माणसांना भेटून आनंद झाला!
खूप दिवसांनी मराठी माणसांना भेटून आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली; पण ती त्यांना चेहऱ्यावर लपवताही आली नाही. आपल्या घरची माणसे भेटीसाठी आल्याबद्दलचे समाधान येथे झळकत होते. सोबत आलेल्या गोव्याच्या माध्यम प्रतिनिधींची त्यांनी आस्थेने चौकशी केली. राजभवनातील त्यांच्या स्टाफला याचे विशेष कौतुक वाटले.