Dharmendra Pradhan Global Media Pudhari
राष्ट्रीय

CJP Protest: BBC, CNN, NYT, Guardian... धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची जगभर चर्चा; आंतरराष्ट्रीय माध्यमं काय म्हणतात?

Dharmendra Pradhan Global Media: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर BBC, The Guardian, CNN, The New York Times, Al Jazeera आणि Dawn यांसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या घडामोडीची दखल घेतली.

पुढारी वृत्तसेवा

Dharmendra Pradhan Global Media: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या घडामोडीची दखल जगभरातील प्रमुख वृत्तसंस्थांनी घेतली आहे. BBC, The Guardian, The New York Times (NYT), CNN, Al Jazeera आणि Dawn यांसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या राजकीय दबावावर आणि सरकारच्या भूमिकेवर विविध लेख प्रकाशित केले आहेत.

BBC : "विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सरकारला माघार घ्यावी लागली"

BBC च्या वृत्तानुसार, 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुतेक आंदोलनांबाबत कठोर भूमिका घेतली होती. मात्र NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा प्रभाव आणि त्यामागील जनसमर्थनाचा योग्य अंदाज सरकारला आला नाही, असे विश्लेषण BBC ने केले आहे.

वृत्तात असेही नमूद करण्यात आले आहे की, सुरुवातीला आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि सरकारवरील दबाव वाढत गेला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना हा मोठा विजय वाटत असल्याचेही BBC ने म्हटले आहे.

BCC

The Guardian : "12 वर्षांत सार्वजनिक दबावामुळे मंत्र्याचा पहिला राजीनामा"

The Guardian ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, भाजपच्या सुमारे 12 वर्षांच्या कारकिर्दीत सार्वजनिक दबावामुळे पंतप्रधान मोदी यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांपैकी एकाला पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची ही पहिली घटना आहे, असे विश्लेषण केले आहे.

वृत्तात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचा (CJP) उल्लेख करत, जंतर-मंतरवर राजीनाम्याची बातमी समजताच आंदोलनकर्त्यांनी जल्लोष केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

The Guardian

New York Times : "विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश"

The New York Times ने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थी आंदोलनाचे हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. वृत्तानुसार, NEET पेपरफुटी प्रकरणानंतर सुरू झालेले हे आंदोलन केंद्र सरकारच्या मोठ्या राजकीय आव्हानांपैकी एक आहे.

NYT ने असेही नमूद केले की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा विस्तार झाला. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांनी यापूर्वी आंदोलनाबाबत केलेल्या काही वक्तव्यांचाही उल्लेख या वृत्तात करण्यात आला आहे.

New York Times

Al Jazeera : "भारतातील विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय"

Al Jazeera ने आपल्या वृत्तात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला देशभरातील विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश म्हटले आहे. या आंदोलनामुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि सरकारी जबाबदारी यांसारख्या मुद्द्यांवर तरुणांमध्ये वाढत असलेली नाराजीही समोर आल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Al Jazeera

CNN : "आंदोलन संपलेले नाही"

CNN च्या वृत्तानुसार, NEET परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सरकारकडे जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती. धर्मेंद्र प्रधान यांनी वाढत्या सार्वजनिक दबावाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला असल्याचे CNN ने म्हटले आहे. तसेच, आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणांची मागणी कायम ठेवली असून, लढा अद्याप संपलेला नसल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

CNN

Dawn : "विद्यार्थी आंदोलनाचा मोठा टप्पा"

पाकिस्तानातील Dawn वृत्तपत्रानेही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश म्हटले आहे. आंदोलनामुळे हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. राजीनाम्यानंतर जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांनी जल्लोष केला, राष्ट्रगीत गायले आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केल्याचाही उल्लेख या वृत्तात करण्यात आला आहे.

Dawn

आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भारतातील विद्यार्थी आंदोलन आणि NEET पेपरफुटी प्रकरणाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. विविध जागतिक माध्यमांनी या घडामोडीकडे विद्यार्थी आंदोलन, सार्वजनिक दबाव आणि सरकारची राजकीय जबाबदारी या दृष्टिकोनातून पाहत स्वतंत्र विश्लेषणे प्रसिद्ध केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT