Uttarakhand Sexist Remark Controversy Pudhari
राष्ट्रीय

Viral Video: ‘25 हजारांत मुली मिळतात’, भाजप महिला मंत्र्याच्या पतीच्या विधानावरुन वाद

BJP sexist remark: उत्तराखंडच्या महिला सक्षमीकरण मंत्री रेखा आर्य यांच्या पती गिरधारी लाल साहू यांच्या कथित वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. “बिहारमध्ये 20–25 हजारांत मुली मिळतात” असे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Rahul Shelke

Uttarakhand Sexist Remark Controversy: उत्तराखंडमधील महिला सक्षमीकरण आणि बालविकास मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असून, या प्रकरणामुळे सत्ताधारी भाजप अडचणीत सापडली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ही घटना सोमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शीतलाखेत मंडळात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान घडली असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये गिरधारी लाल साहू एका अविवाहित कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना दिसत आहेत.

या व्हिडिओत त्यांनी “मुलींची काहीच कमतरता नाही” तसेच “बिहारमध्ये 20 ते 25 हजार रुपयांत लग्नासाठी मुली मिळतात” असे विधान केल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वातावरण तापले. काँग्रेसने या विधानावर प्रतिक्रिया देत याला महिलांचा अपमान म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ज्योती रौतेला यांनी हे वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे असल्याचे सांगत महिला सक्षमीकरण मंत्री रेखा आर्य यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.

मंत्री आणि त्यांच्या पतींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांच्या पतीने असे विधान करणे दुर्दैवी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

दरम्यान, गिरधारी लाल साहू यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झालेले आहेत. एका मर्डर प्रकरणात त्यांचे नाव चर्चेत होते. तसेच, एका नोकराची फसवणूक करून त्याची किडनी काढून घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

संबंधित नोकर नरेश चंद्र गंगवारचा दावा आहे की 2015 मध्ये मदतीच्या बहाण्याने त्यांना श्रीलंकेत नेण्यात आले आणि तेथे कोलंबोमधील रुग्णालयात त्यांची किडनी काढण्यात आली. सुरुवातीला दबावामुळे आपण गप्प राहिलो, मात्र नंतर पोलिसांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले होते. सध्या त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वाद सुरू असून भाजपवर दबाव वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT