Viral Video
मुंबई : लग्नासाठी मुलगा कसा हवा? तर सुशिक्षित, निर्व्यसनी आणि चांगल्या पगाराचा... साधारणपणे अशाच अपेक्षा असतात. पण सध्या सोशल मीडियावर एका तरुणीने या सगळ्या कल्पनांनाच छेद दिला आहे. तिला नवरा तर हवाय, पण तो 'दारु पिणारा असला तरी चालेल! एवढंच नाही, तर ती स्वतः हुंडा म्हणून लाखो रुपये आणि बुलेट देण्यासही तयार आहे. तिचा हा अजब मागणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, नेटकरी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी खुलेआम स्वतःसाठी वर शोधत असल्याचे सांगत आहे. पण तिच्या अटी ऐकून कोणीही चक्रावून जाईल. ती म्हणते, "मला असा नवरा हवा आहे, ज्याला दारू पिण्याची सवय असेल." जिथे प्रत्येक पालक आपल्या मुला-मुलीसाठी व्यसनांपासून दूर असणारा जोडीदार शोधतो, तिथे या तरुणीच्या मागणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतकंच नाही, तर ती होणाऱ्या नवऱ्याला काय देणार याची यादीही सांगते. तिच्या म्हणण्यानुसार, ती वराला ५ लाख रुपये रोख, एक नवी कोरी बुलेट मोटरसायकल आणि एक 'दिवाण पलंग' देणार आहे. तिची ही अनोखी ऑफर आणि वरासाठी ठेवलेली विचित्र अट, यांमुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ खरा आहे की केवळ मनोरंजनासाठी बनवलेला एक प्रँक आहे, याबाबत साशंकता आहे. मात्र, कारण काहीही असो, या व्हिडिओने नेटकऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. युजर्स यावर एकापेक्षा एक मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युझरने लिहिले, "दारू पिणाऱ्या भावांनो, चला लवकर रांगेत उभे राहा." दुसऱ्याने म्हटले, "मग हे नातं पक्कं समजायचं का?" एका युझरने तरुणीची चूक सुधारत कमेंट केली, "ताई, तो 'दिवाणा' नाही, 'दिवाण' पलंग असतो." तर आणखी एकाने मजेत लिहिले, "भावा, मला निळ्या ड्रममध्ये बंद व्हायचं नाहीये." एकंदरीत, या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच हवा केली आहे. या तरुणीची मागणी खरी असो वा खोटी, तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.