नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका सुटकेसमध्ये नऊ वर्षांच्या मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.७) ईशान्य दिल्लीतील नेहरू विहारमध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्या मुलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या भयानक घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यामुळे राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच मुद्द्याला धरून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्या अतिशी यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. तसेच सोशल मीडियावरूनही भाजप सरकारवर हल्ला चढवला जात आहे.
या घटनेवरून अतिशी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, दिल्लीतील ९ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि तिच्या हत्येला कोण जबाबदार आहे? बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेला कोण जबाबदार आहे? भाजपचे ४ इंजिन असलेले सरकार आहे, तरीही आमच्या मुली सुरक्षित नाहीत? मुख्यमंत्री रेखा गुप्ता कुठे आहेत? देशाचे गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत? तसेच दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण आहे, त्यामुळे सतत घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचे म्हणणे आहे की, काही संशयितांची चौकशी केली जात आहे आणि लवकरच या प्रकरणात मोठी कारवाई केली जाऊ शकते. विरोधी पक्ष तसेच सामाजिक संघटना आणि बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास केला जात आहे.
ईशान्य दिल्लीत रक्ताने माखलेल्या सुटकेसमध्ये एका ९ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. काही लोकांनी सांगितले की, शनिवारी ईशान्य दिल्लीतील नेहरू विहारमध्ये एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीवरून पोलिसांना लैंगिक अत्याचाराचा संशय आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दयालपूर पोलिस ठाण्यात रात्री ८:४१ वाजता फोन आल्यानंतर, नेहरू विहारच्या लेन क्रमांक २ मध्ये एक पथक पाठवण्यात आले. मात्र मुलीच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेत तिला आधीच रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांना तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळून आल्या.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरूद्धात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुरावे गोळा करण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक पथकेही दिल्ली पोलिसांनी तैनात केली आहेत.