Ghulam Nabi Azad |
कुवैत : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची जगासमोर पोलखोल करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या कुवैत देशात आहे. या शिष्टमंडळातील जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना प्रकृती बिघडल्याने कुवैतमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी आझाद यांनी याबाबत माहिती दिली. तसेच त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले. कुवेतमधील अति उष्णतेमुळे माझ्या प्रकृतीवर परिणाम होत असूनही, देवाच्या कृपेने मी बरा आहे आणि बरा होत आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. सर्व चाचण्या सामान्य आहेत. तुमच्या सर्वांच्या काळजी आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, असे आझाद यांनी म्हटले आहे.
कुवैतमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी सांगितले की, आमच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याच्या अर्ध्या वाटेवर गुलाम नबी आझाद यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. बहरीन आणि कुवेतमधील बैठकांमध्ये त्यांनी अत्यंत प्रभावी भारताची बाजू मांडली. शिष्टमंडळाचा पुढील दौरा सौदी अरेबिया आणि अल्जेरियामध्ये आहे, यामध्ये त्यांची उणीव भासेल.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आझाद यांच्या रुग्णालयात दाखल होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानी दहशतवादाविरुद्ध भारताच्या कारवाईला बळकटी देण्यासाठी पाठवलेल्या शिष्टमंडळातील एक सदस्य कुवेतमध्ये रुग्णालयात दाखल झाला आहे, हे ऐकून मला काळजी वाटली. आम्ही त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.