नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पृथ्वीच्या भूगर्भात सातत्याने बदल होत आहेत. मानवासाठी हे बदल लाखो-कोट्यवधी वर्षांत होत असले, तरी निसर्गासाठी त्याचा वेग कमालीचा वाढला असल्याचे एका नवीन संशोधनात समोर आले आहे. शास्त्रज्ञांनी पूर्व आफ्रिकेच्या भूगर्भातील प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकला आहे.
‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनानुसार, इथिओपियाच्या अफार प्रदेशाखालील पृथ्वीच्या गाभ्यातून वितळलेल्या खडकांचे स्फोट होत असून, त्याचे वर्णन ‘भूगर्भीय हार्टबीट’ असे करण्यात आले आहे. उष्णता आणि ज्वालामुखीतून बाहेर येणारा लाव्हा यांचे हे स्फोट हळूहळू भूकवच कमकुवत करत आहेत. यामुळे भूकंप, ज्वालामुखींचा उद्रेक आणि जमिनी सतत फाटणे आदी प्रक्रिया सुरू आहेत. पुढील पाच ते दहा दशलक्ष वर्षांत आफ्रिका दोन भागांत विभागला जाऊन एका नव्या महासागराला जन्म देईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
शास्त्रज्ञांच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, इथिओपियातील अफार डिप्रेशन हे पृथ्वीवरील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे लाल समुद्र दरी, अदनचा आखात दरी प्रदेश आणि मुख्य इथिओपियन दरी या तीन भूगर्भीय भेगा एकत्र येतात. त्यांना ‘ट्रिपल जंक्शन’ म्हणूनही ओळखले जाते. येथे वारंवार होणारे भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक यामुळे हा प्रदेश चर्चेत असतोच. आता शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, या हालचालींमागील कारण म्हणजे येथील जमिनीखालील वितळलेल्या खडकांचा स्तंभ अखंड प्रवाहात न येता लहरी स्वरूपात वर येते.