भाजपचे नेते आणि ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. 
राष्ट्रीय

Gaurav Bhatia defamation suit : अभिजित दीपके, सौरव दास, आशुतोष रांकांविरोधात गौरव भाटिया यांचा दोन कोटींचा मानहानी दावा

उच्‍च न्‍यायालयात ९ सप्‍टेंबर रोजी सुनावणीची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

Gaurav Bhatia defamation suit

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते आणि ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दोन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी ९ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

एक्सवरील एका पोस्टवरून वाद

५ सप्टेंबर रोजी एक्सवरील एका पोस्टवरून भाटिया आणि सौरव दास यांच्यात वाद निर्माण झाला होता. दास यांनी भाटिया यांच्या छायाचित्रासह एक ग्राफिक पोस्ट केले होते. या ग्राफिकमध्ये भाटिया यांच्या नावाने स्वतंत्र भारद्वाज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे दाखवण्यात आले होते.

भाटिया यांनी केली होती पोस्‍ट हटविण्‍याची मागणी

भाटिया यांनी हे ग्राफिक बनावट आणि एआयच्या माध्यमातून तयार केलेले असल्याचे सांगत पोस्ट हटवून बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली होती. दास यांनी नंतर ही पोस्ट हटवली आणि ग्राफिक एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी भाटिया यांच्याकडे बिनशर्त माफी मागितली नाही. यानंतर भाटिया यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.

सोशल मीडिया ट्रायल किंवा वक्तव्यांची लढाई नको : गौरव भाटिया

मंगळवारी एक्सवरील पोस्टद्वारे मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती देताना भाटिया यांनी म्हटले की, आरोप मर्यादा ओलांडतात, तेव्हा कायदा आपली सीमा आखतो. सोशल मीडिया ट्रायल किंवा वक्तव्यांची लढाई नको तर तथ्य, पुरावे आणि कायद्याच्या आधारे सत्याची परीक्षा न्यायालयातच होईल. भाटिया यांनी नुकसानभरपाईसह संबंधित पोस्टवर प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हा वाद स्वतंत्र भारद्वाज यांच्याशी संबंधित एका वेगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाला आहे. सीजेपी कार्यकर्त्या निशू आझाद यांच्या वडिलांवरील कथित हल्ल्याप्रकरणी भारद्वाज यांच्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतर भारद्वाज यांच्याबाबत सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT