नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी तब्बल २० राज्यांत चांगला पाऊस झाला असून, पुढील चार दिवस मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह १५ राज्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगेच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने घाटांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. हरिश्चंद्र घाटावरील अंत्यसंस्काराची जागाही पाण्याखाली गेल्याने वरच्या पायऱ्यांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. उन्नावमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने चक्क बोटींचा वापर करण्याची वेळ आली.
राजस्थानातील पाचहून अधिक जिल्ह्यांत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. जयपूरमध्ये चार तासांहून अधिक काळ पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी साचले. रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बस उलटून दहा जणांहून अधिक प्रवासी जखमी झाले. झुंझुनूमध्ये रस्त्यांवरून नदीसारखे पाणी वाहत असल्याने अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. झाडे कोसळल्याने आणि रस्ते जलमय झाल्याने वाहतूक कोंडीही झाली.
दिल्लीतील अनेक भागांतही पाणी साचले असून, वाहतूक कोंडी झाली. गुजरातमधील पालनपूर-अंबाजी महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर असून, आतापर्यंत १०३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पूरग्रस्त आसामसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशात पावसामुळे सुमारे २०० रस्ते सध्या बंद आहेत. मंडीमध्ये सर्वाधिक ६४, कुल्लूमध्ये ६० आणि शिमल्यात ३२ रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. राजगढ येथे तीन मजली घर कोसळून आई आणि मुलीचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर जखमी झाली.
मध्य प्रदेशात सलग चार दिवस पाऊस सुरू असून, पूर्व भागातील जबलपूर, रीवा आणि शहडोल विभागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे. बिहारमधील १५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, वीज कोसळण्याबाबतही सतर्कतेचा इशारा आहे. झारखंडमध्ये १६ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे. शिमल्याजवळील शकराला गावात डोंगर खचत असून अनेक घरांना तडे गेले आहेत. आसाममध्ये आत्तापर्यंत १०३ मृत्यू झाले आहेत.