नवी दिल्ली : गडचिरोलीतील आदिवासी वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून काँग्रेसने महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राज्यातील सर्व आदिवासी वसतिगृहांचे तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच गडचिरोलीतील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोलीतील खनिजसंपत्ती आणि उद्योगांना प्राधान्य आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.
गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदावरूनही निशाणा
गडचिरोलीचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. भूरिया यांनी सरकारच्या आदिवासी भागातील प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असताना या भागातील खनिजसंपत्ती व उद्योगांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भूरिया यांनी नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. भूरिया यांनी महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. गडचिरोलीतील एका वसतिगृहात ७० हून अधिक विद्यार्थिनींना एका खोलीत जमिनीवर झोपावे लागत होते. खिडक्यांना सुरक्षा जाळ्या नसल्याने विषारी सापांचा धोका कायम होता. सर्पदंशाच्या घटनेत सहापैकी तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले.
वसतिगृहात ७० विद्यार्थिनी, पण मूलभूत सुविधा नाहीत
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांमध्ये निवास, सुरक्षा आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधांचीच वानवा असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना धोकादायक परिस्थितीत राहावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी वसतिगृहांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. भुरिया यांनी केली. महाराष्ट्रातील वसतिगृहांमधील परिस्थितीबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालांचा दाखला देत, गेल्या दोन वर्षांत राज्यातील आदिवासी वसतिगृहांमध्ये ५५० ते ६०० मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा भूरिया यांनी केला. या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये वसतिगृहांच्या दुरवस्थेविरोधात विद्यार्थी उपोषणाला बसले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील घटनेचाही उल्लेख
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये बैगा समाजातील मुलांच्या कुपोषण, मलेरिया आणि गोवरामुळे झालेल्या मृत्यूंचाही डॉ. भूरिया यांनी उल्लेख केला. काँग्रेसने या दोन्ही घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली. आदिवासी मुलांच्या पोषण आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली. आदिवासी भागातील आरोग्य व पोषण व्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. बालाघाटमधील प्रभावित भागात सहा महिन्यांपासून घरपोच पोषण आहार बंद असल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासी विकासासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध होत असताना त्याचा प्रत्यक्ष लाभ आदिवासींपर्यंत का पोहोचत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.