नवी दिल्ली : कॅनडात जी-७ शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. १८) सकाळी क्रोएशियाला रवाना झाले. मंगळवारी कॅनडात जी ७ शिखर परिषदेत मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी झालेली भेट विशेष ठरली. मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत भारत-इटली मैत्रीचं कौतुक केलं.
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'इटली आणि भारत हे घनिष्ठ मैत्रीने जोडलेले आहेत.' यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर देताना म्हटले, 'पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, मी तुमच्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे. इटलीसोबतची भारताची मैत्री अधिक दृढ होत राहील, जी आपल्या दोन्ही देशांतील लोकांसाठी फायदेशीर ठरेल.'
कॅनडातील कनानस्किस येथे सुरु असलेल्या जी७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मंगळवारी दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रप्रमुखांशीही चर्चा केली. मोदींनी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम पार्डो यांची भेट घेऊन 'ग्लोबल साउथ'च्या प्राधान्यक्रमांसह महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर संवाद साधला. दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच औपचारिक भेट होती.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांचीही मोदींनी भेट घेतली. 'कॅनडात जी-७ शिखर परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे माझे मित्र पंतप्रधान अल्बानीज यांना भेटून आनंद झाला,' असे मोदींनी 'एक्स' वर आपल्या पोस्टमध्ये म्हटले. तसेच, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला व त्यांच्यासोबतच्या चर्चेचा एक फोटो 'एक्स' वर शेअर केला. यादरम्यान पंतप्रधान मोदींची कॅनडाचे मार्क कार्नी यांच्याशीही भेट झाली.
जी७ शिखर परिषदेला उपस्थित राहण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले होते की, ते या परिषदेत जागतिक नेत्यांशी संवाद साधताना महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांवर चर्चा करतील आणि विशेषतः 'ग्लोबल साउथ'च्या हिताच्या आणि प्राधान्याच्या मुद्द्यांवर अधिक भर देतील.