नवी दिल्ली (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जोहान्सबर्ग येथे होणार्या जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना झाले. वसुधैव कुटुंबकम् आणि एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या आपल्या दूरद़ृष्टीनुसार या मंचावर भारताची भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आफ्रिका खंडात जी-20 शिखर परिषद आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. ही एक विशेष शिखर परिषद आहे. कारण ती आफ्रिकेत होत आहे. तेथे विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा होईल. शिखर परिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांना भेटणार आहे. वसुधैव कुटुंबकम् आणि एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या आमच्या दूरद़ृष्टीनुसार मी शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडणार आहे, असे मोदी यांनी नमूद केले. ही एक विशेष शिखर परिषद असेल. कारण आफ्रिकेत होणारी ही पहिली जी-20 शिखर परिषद आहे. 2023 मध्ये भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली, आफ्रिकन युनियन जी-20 चा सदस्य बनला होता, असे मोदी आपल्या निवेदनात म्हणाले.
ही शिखर परिषद महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची एक संधी असेल. या वर्षीच्या जी-20 ची संकल्पना एकता, समानता आणि शाश्वतता आहे, ज्याद्वारे दक्षिण आफ्रिकेने आणि ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे झालेल्या मागील शिखर परिषदांचे परिणाम पुढे नेले आहेत. मी भागीदार देशांच्या नेत्यांसोबतच्या माझ्या संवादासाठी आणि परिषदेच्या निमित्ताने होणार्या सहाव्या शिखर परिषदेतील सहभागासाठी उत्सुक आहे, असे यावेळी मोदी म्हणाले.