राष्ट्रीय

G20 जाहीरनाम्यावर एकमत : पंतप्रधान मोदींची घोषणा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  आमच्‍या टीमचे कठाेर परिश्रम आणि  तुमच्या सहकार्यामुळे G20 जाहीरनाम्‍यावर नेत्‍यांचे एकमत झाले आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.९) केली. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधान मोदींनी केलेल्‍या घोषणेनंतर सदस्यांच्या टाळ्यांच्‍या गजरात याचे स्‍वागत केले. (G20 leaders declaration ) सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या जाहीरनाम्याला सर्व देशांची संमती मिळाली आहे. या जाहीरनाम्यात चारवेळा युक्रेनचाही उल्लेख आहे. तसेच चांद्रयान-३ च्या यशाबद्दल भारताचे अभिनंदनही करण्यात आले आहे.

जाहीरनाम्‍यात युक्रेन संघर्षावरही भाष्‍य

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १५० तासांहून अधिक वाटाघाटीनंतर G20 देशांच्या वार्ताकारांनी युक्रेन संघर्षावरही भाष्‍य केले आहे. या जाहीरनाम्‍यात युक्रेन युद्धाचा उल्लेख चारवेळा करण्यात आला आहे. रशियाचे नाव न घेता जाहीरनाम्यात "युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता" प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रशियावर प्रत्‍यक्ष टीका टाळून सदस्य राष्ट्रांना "प्रादेशिक संपादन मिळविण्यासाठी बळाचा वापर करण्याच्या धमकीपासून परावृत्त" किंवा कोणत्याही राष्ट्राच्या प्रादेशिक अखंडतेला खीळ घालणाऱ्या कोणत्याही कृतीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अण्वस्त्रांचा वापर किंवा धमकी 'अस्वीकार्य' मानली जाते यावरही या घोषणेमध्ये भर देण्यात आला आहे. "आजचे युग युद्धाचे नसावे", या घोषणेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

यापूर्वी रशिया-युक्रेन वादामुळे या जाहीरनाम्याला मंजुरी मिळण्यात अडचणी येत होत्या. तथापि, भारताने घोषणेच्या परिच्छेदांमध्ये बदल केले, ज्यामुळे मान्यता मिळणे सोपे झाले. पंतप्रधान मोदी यांनी या संयुक्त घोषणेला मंजुरी देणाऱ्या G20 शेर्पा, मंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांच्या मेहनतीबद्दल त्यांचे कौतुक केले.

शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात भारताने आफ्रिकन युनियनला G20 चा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष म्हणून सर्व देशांच्या संमतीने तो मंजूर केला. भारताच्या या प्रस्तावाला चीन आणि युरोपीय संघानेही पाठिंबा दिला होता. आफ्रिकेतील 55 देशांना संघाचे सदस्यत्व मिळाल्याचा फायदा होणार आहे. दरम्‍यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, सर्व देशांनी नवी दिल्लीची घोषणा मान्य केली आहे.

G20 जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे…

    • सर्व देश शाश्वत विकास लक्ष्यांवर काम करतील. भारताच्या पुढाकारावर 'वन फ्युचर अलायन्स'ची स्थापना हाेईल.
    • जैव इंधन वापराला प्राेत्‍साहन देण्‍यासाठी संघटना  तयार केला जाईल. भारत, अमेरिका आणि ब्राझील हे त्याचे संस्थापक सदस्य असतील.
    • एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य यावर भर दिला जाईल.
    • बहुपक्षीय विकास बँका मजबूत केल्या जातील. ते अधिक चांगले, मोठे आणि अधिक प्रभावी केले जातील.
    • ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांवर भर दिला जाईल.
    • क्रिप्टोकरन्सीबाबत जागतिक धोरण बनवण्यासाठी चर्चा हाेईल.
    • कर्जाबाबत एक चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी समान फ्रेमवर्क बनविण्यावर भारताने भर दिला आहे.
    • जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांना निधी दिला जाईल.
    • ग्रीन आणि लो कार्बन एनर्जी तंत्रज्ञानावर काम केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT