नवी दिल्ली : दररोज पर्यावरणीय उद्दिष्टे आणि संबंधित कार्यक्रम आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हा संदेश आपल्याला पर्यावरणाशी संबंधित सर्व दिवस देतात. शक्य तितके पर्यावरणाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी केले. जागरूकता आणि सर्वांच्या सहभागावर आधारित सतत सक्रियतेतूनच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन शक्य होईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. नवी दिल्लीमध्ये 'पर्यावरण –२०२५ ' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, आपल्या मुलांना आणि तरुण पिढीला पर्यावरणीय परिवर्तनाला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागेल; शिवाय त्यात योगदान देखील द्यावे लागेल. प्रत्येक कुटुंबातील वडीलधाऱ्यांना त्यांची मुले कोणत्या महाविद्यालयात शिकतील आणि कोणते करिअर निवडतील याची चिंता असते; ही चिंता रास्त आहे. मात्र, आपण सर्वांनी हा देखील विचार केला पाहिजे की आपली मुले कोणत्या प्रकारच्या हवेत श्वास घेतील, त्यांना कोणत्या प्रकारचे पाणी पिण्यासाठी मिळेल, त्यांना पक्ष्यांचे गोड आवाज ऐकू येतील की नाही, त्यांना हिरव्यागार जंगलांचे सौंदर्य अनुभवता येईल की नाही.
त्या म्हणाल्या की, या विषयांना आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक पैलू आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व विषयांशी संबंधित आव्हानांना नैतिक पैलू देखील आहे. येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ पर्यावरणाचा वारसा देणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यासाठी आपल्याला पर्यावरणाविषयी जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली स्वीकारावी लागेल जेणेकरून पर्यावरणाचे केवळ संरक्षणच होणार नाही तर ते अधिक समृद्धही होईल आणि पर्यावरण अधिक चैतन्यशील बनेल. स्वच्छ पर्यावरण आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधणे ही एक संधी आणि आव्हान दोन्ही आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की, निसर्ग, आईप्रमाणे आपले पोषण करतो यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आपण निसर्गाचा आदर आणि संरक्षण केले पाहिजे. विकासाच्या भारतीय वारशाचा आधार पोषण आहे, शोषण नाही; संरक्षण आहे, निर्मूलन नाही. या परंपरेचे अनुसरण करून, आपल्याला विकसित भारताकडे वाटचाल करायची आहे. गेल्या दशकात, आंतरराष्ट्रीय करारांनुसार भारताने राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या योगदानाची लवकर पूर्तता करण्याची अनेक उदाहरणे साध्य केली आहेत या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) ने आपल्या देशाच्या पर्यावरणीय प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पर्यावरणीय न्याय किंवा हवामान न्यायाच्या (संतुलनाच्या) क्षेत्रात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. एनजीटीने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा आपल्या जीवनावर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या पृथ्वीच्या भविष्यावर व्यापक परिणाम होतो. पर्यावरण व्यवस्थापन इको-सिस्टमशी संबंधित संस्था आणि नागरिकांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, आपण सर्वांनी २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचे आहे जिथले हवा, पाणी, हिरवळ आणि समृद्धी संपूर्ण जागतिक समुदायाला आकर्षित करेल. एनजीटी द्वारे आयोजित ‘पर्यावरण – २०२५’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट प्रमुख भागधारकांना एकत्र आणून पर्यावरणीय आव्हानांवर चर्चा करणे, सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आणि शाश्वत पर्यावरण व्यवस्थापनासाठी भविष्यातील कृती योजनांवर सहयोग करणे हे आहे.