नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचार्यांना आठव्या वेतन आयोगांतर्गत पेन्शन कम्युटेशनच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शन कम्युटेशनचा कालावधी 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा विचार सुरू आहे. याचा अंमल झाल्यास निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळणार आहे.
कम्युटेड पेन्शन पुनर्स्थापनेचा कालावधी 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याची मागणी जोर धरत आहे. ही दीर्घकाळ चाललेली मागणी राष्ट्रीय परिषद कर्मचारी पक्षाच्या वतीने केंद्राला सादर केलेल्या मागण्यांच्या सनदेमध्ये समाविष्ट आहे. हा मुद्दा आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींचा भाग बनेल आणि लाखो पेन्शनधारकांना याचा फायदा होईल.
सरकारी कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की, 15 वर्षांचा पुनर्स्थापना कालावधी खूप जास्त आहे. हे आर्थिकदृष्ट्याही अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्याज दरात घट झाल्यामुळे सरकारद्वारे वसुलीच्या गणनेत असमानता वाढली आहे. यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्यांना त्यांच्याच पेन्शनचा मोठा हिस्सा गमवावा लागतो. जर हा कालावधी 12 वर्षे केला गेला, तर कर्मचार्यांना त्यांची संपूर्ण पेन्शन लवकर मिळू शकेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
नॅशनल कौन्सिल स्टाफ साईडने अलीकडेच कॅबिनेट सचिवांना मागण्यांची एक सनद सादर केली आहे. यामध्ये अनेक प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे, ज्यात कम्युटेड पेन्शनच्या पुनर्स्थापनेचा कालावधी 15 वरून 12 वर्षे करणे ही प्रमुख मागणी आहे. ही मागणी आता सरकारद्वारे आठव्या वेतन आयोगाच्या टर्म ऑफ कंडिशनमध्ये समाविष्ट करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे आगामी काळात हा बदल प्रत्यक्षात लागू होऊ शकतो, ही अपेक्षा अधिक दृढ झाली आहे.
सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. सामान्यतः नवीन वेतन आयोग 10 वर्षांच्या अंतराने लागू होतो. त्यामुळे आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जात आहे.
जेव्हा सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात, तेव्हा त्यांना त्यांच्या पेन्शनचा एक भाग एकरकमी घेण्याचा पर्याय मिळतो. यालाच पेन्शनचे कम्युटेशन म्हणतात. या बदल्यात त्यांची मासिक पेन्शन कापली जाते, जेणेकरून सरकार ती एकरकमी रक्कम वसूल करू शकेल. सध्याचा नियम असा आहे की, ही वसुली 15 वर्षांत केली जाते. पुढील 15 वर्षांपर्यंत त्या कर्मचार्याच्या मासिक पेन्शनमध्ये कपात होत राहते आणि 15 वर्षांनंतर संपूर्ण पेन्शन पुन्हा सुरू केली जाते.