मेहुल चोक्सी File Photo
राष्ट्रीय

फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी

Mehul Choksi | सध्या चोक्‍सी पत्‍नीसह बेल्‍जिअममध्ये वास्‍तव्याला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: गीतांजली जेम्सचा मालक आणि १३,८५० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या तो पत्नी प्रीतीसह "एफ रेसिडेन्सी कार्ड" वर बेल्जियममधील अँटवर्प येथे राहत आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर तो २०१८ मध्ये भारतातून अँटिग्वा-बार्बुडा येथे पळून गेला. त्याला भारतात आणण्यासाठी, अधिकाऱ्यांनी बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत १३,८५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यापूर्वी, चोकसीने त्याचा पासपोर्ट निलंबित झाल्यामुळे तो भारतात परतू शकत नसल्याचे निमित्त केले होते. २०१८ मध्ये भारत सोडण्यापूर्वी २०१७ मध्येच अँटिग्वा-बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते. मेहुलने प्रकृती बिघडल्याचे कारण देत भारतात येण्यास वारंवार नकार दिला. कधीकधी तो फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समोर येतो. भारतातील त्याच्या अनेक मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.

अँटिग्वाहून गायब डोमिनिकाला पोहोचला, ५१ दिवस तुरुंगात घालवले

तो मे २०२१ मध्ये अँटिग्वामधून गायब झाला आणि शेजारच्या डोमिनिकामध्ये पोहोचला. येथे त्याला अटक करण्यात आली. त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी सीबीआयचे एक पथक डोमिनिका येथे पोहोचले, परंतु त्यापूर्वीच त्याला ब्रिटिश राणीच्या प्रिव्ही कौन्सिलकडून दिलासा मिळाला. नंतर त्याला पुन्हा अँटिग्वाला सोपवण्यात आले.

तथापि, मेहुलला डोमिनिका तुरुंगात ५१ दिवस काढावे लागले. येथे त्याने असा युक्तिवाद केला होता की त्याला अँटिग्वाला जाऊन तेथील न्यूरोलॉजिस्टकडून उपचार घ्यायचे आहेत. अँटिग्वाला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी, डोमिनिका न्यायालयाने चोक्सीविरुद्ध दाखल केलेले खटलेही रद्द केले. मेहुलने बेल्जियममध्ये निवास मिळविण्यासाठी खोटे आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचे समजते. त्याने आपले भारतीय आणि अँटिग्वा नागरिकत्व लपवले आणि चुकीची माहिती दिली जेणेकरून त्याला भारतात पाठवता येणार नाही. मेहुल आता स्वित्झर्लंडला जाण्याचा विचार करत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्याने कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्याचे निमित्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT