नवी दिल्ली : इराणच्या अणुप्रकल्पांवरील अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे आणि त्याचा मोठा फटका भारताला बसू शकतो. म्हणजेच भारतात तेलाच्या किमती शिगेला पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत सध्या आपल्या एकूण गरजेपैकी सुमारे 80 ते 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. यामध्ये इराणचा वाटा सुमारे वीस टक्के होता. मात्र, इराणकडून तेल खरेदी करण्यास भारताला अमेरिकेने मनाई केली. वास्तविक भारत इराणकडून एकूण गरजेच्या 18 ते 20 टक्के तेल आयात करत होता. हा देश भारताचा खूप जुना मित्र आहे. यामुळे भारताला इराणने डॉलर नव्हे तर तेल खरेदीसाठी रुपयांत व्यवहार करण्याची सवलत दिली होती. शिवाय अन्य देशांच्या तुलनेत भारताला रास्त दराने तेलाची विक्री इराणकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर सध्याचे युद्ध भडकले तर त्याचा आणखी मोठा फटका भारताला बसू शकतो. जर तेल महागले तर त्यामुळे एकूणच महागाईला ते मोठे आमंत्रण ठरू शकते.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणवर हल्ल्यानंतर गुंतवणूकदारांना अपेक्षा होती की, अमेरिकेच्या या हस्तक्षेपामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढेल आणि व्यवहार सुरू झाल्यावर डॉलर व इतर सुरक्षित मालमत्तांची मागणी वाढेल. तथापि, संघर्षाच्या पुढील दिशेबद्दल बरीच अनिश्चितता कायम आहे, असे दिसते.पोटोमॅक रिव्हर कॅपिटलचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मार्क स्पिंडेल म्हणाले, मला वाटते की, बाजारपेठा सुरुवातीला सतर्क होतील आणि तेलाच्या किमती वाढलेल्या दराने उघडतील. स्पिंडेल पुढे म्हणाले, नुकसानीचा कोणताही अंदाज आमच्याकडे नाही आणि त्याला थोडा वेळ लागेल. जरी त्यांनी (अमेरिकेने) हे ‘पूर्ण झाले’असे म्हटले असले तरी, आम्ही यात गुंतलो आहोत. पुढे काय होणार, याचीच चिंता आहे.