Share Market Crash:  pudhari
राष्ट्रीय

हर्षद मेहता स्कॅम ते कोविड... भारतीय शेअर बाजारात यापुर्वीही उडाली होती दाणादाण

Share Market Crash: देशातील सर्वाधिक वाईट मार्केट क्रॅशवर एक नजर...

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: ट्रम्प टॅरिफ्सची घोषणा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने सर्व अमेरिकन वस्तुंवर केलेली 34 टक्के अतिरिक्त आयात शुल्काची घोषणा यामुळे जगभरातील स्टॉक मार्केट धडाधड कोसळले. स्टॉक मार्केट घसरणीचा हाच ट्रेंड सोमवारी 7 एप्रिल 2025 रोजी भारतीय शेअर बाजारातही दिसून आला.

सेन्सेक्स सुरवातीला 3000 अंकांनी निफ्टी 900 अंकांनी कोसळला. मार्केट बंद झाले तेव्हा सेन्सेक्स 2226 अंकांनी तर निफ्टी 742 अंकांनी घसरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांपर्यंत घट नोंदवली होती.

तथापि, शेअर बाजारात मोठ्या घसरणीची ही पहिली वेळ नाही. भारतीय शेअर बाजारात एकाच सत्रात अशी मोठी घसरण यापुर्वीही पाहायला मिळाली आहे. त्याविषयी जाणून घेऊया.. (Share Market Crash History)

1. कोविड-19 क्रॅश (2020)

सन 2020 मध्ये कोरोना महारोगराईने जगाला विळखा घातला होता. त्याचा प्रभाव इतका मोठा होता की तेव्हाही जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड मोठी पडझड झाली होती. भारतात मार्च 2020 मध्ये सेन्सेक्स 41000 वरून 25981 वर घसरला होता.

ही घसरण सुमारे 13 ते 14 टक्के इतकी होती. हा भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर मार्केट क्रॅश होता. 2020 च्या मार्चमध्ये ज्या दिवशी सर्वाधिक मोठी पडझड झाली होती त्यादिवशी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून ट्रेडिंग थांबवले होते.

नंतर काही काळाने पुन्हा ट्रेडिंग सुरू करण्यात आले होते. तेव्हा ट्रेडिंग थांबविण्यापुर्वी अऩेक शेअरच्या किंमतींनी तळ गाठला होता. पण पुन्हा ट्रेडिंग सुरू केल्यावर शेअर एका ठराविक किंमतींवर आले होते.

अर्थात या मोठ्या पडझडीनंतर आर्थिक तरलता, व्याज दर कमी केल्यामुळे 8 महिन्यांत शेअर बाजार पुन्हा सावरला. नोव्हेंबर 2020 मध्ये सेन्सेक्स पुन्हा 41000 वर पोहचला होता. 8 महिन्यांच्या रिकव्हरीचा आणि क्रॅशच्या नीचांकापासून 58 टक्के वाढ सेन्सेक्सने नोंदवली होती.

कोविडवरी लसीकरण, FII नी केलेली गुंतवणूक आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग यामुळे शेअर बाजाराला गतीने चालना मिळाली. तेथून मार्च 2024 अखेर शेअर बाजार 85978.25 असा सार्वकालिक सर्वोच्च उच्चांकी स्थानापर्यंत पोहोचला होता.

2) जागतिक आर्थिक संकट (2008)

2008 च्या जागतिक आर्थिक संकटामुळे भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली होती. त्यावेळी सेन्सेक्स 21000 वरून 8000 वर आला होता. जगभरातील आर्थिक गोंधळाच्या वातावरणामुळे त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारात उमटले होते.

तेव्हा जगभरातील काही प्रमुख वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केली होती. त्यानंतर प्रोत्साहनपर उपाय, व्याज दर कमी केल्यामुळे नोव्हेंबर 2010 मध्ये भारतीय शेअर बाजाराने पुन्हा 21000 ची पातळी गाठली. 162 टक्क्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी दोन वर्षांचा काळ लागला होता.

3. केतन पारेख क्रॅश (डॉट-कॉम बबल) (2001)

सन 2001 मध्ये केतन पारेख घोटाळा आणि डॉट-कॉम बबलचा फुगवटा फुटला आणि भारतीय शेअर बाजारात मोठा क्रॅश नोंदवला गेला. यावेळी सेन्सेक्स 4200 वरून 2594 पर्यंत घसरला होता. यावेळी शेअर बाजाराने पुन्हा गती घेण्यास विलंब झाला होता.

2003 मध्ये शेअरबाजाराने गती पकडली आणि 2004 च्या मध्यापर्यंत सेन्सेक्स पुन्हा 4200 अंकांवर पोहचला. भारताच्या जीडीपीतील मजबूत वाढ, IT क्षेत्राची वाढ, भारताच्या आर्थिक क्षमतेमध्ये जागतिक गुंतवणूकदारांचा वाढलेला रस यामुळे शेअरबाजाराला चालना मिळाली.

4. हर्षद मेहता घोटाळा (1992)

1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला आणि भारतीय बाजारात एक भयंकर घसरण झाली. या घोटाळ्यामुळे सेन्सेक्स 4467 वरून थेट 2529 पर्यंत घसरला. त्यानंतर बाजारने हळूहळू गती घेत 1996 मध्ये सेन्सेक्स 4600 च्या वर गेला. नीचांकापासून ही 82 टक्के वाढ होती.

आर्थिक सुधारणांचा आणि उदारीकरणाच्या धोरणांचा, गुंतवणूकदारांची जागरूकता वाढवण्याचा आणि संस्थात्मक सुरक्षितता वाढवण्याच्या निर्णयांचा शेअर बाजार सावरण्यात मोठा वाटा होता, ज्यामुळे बाजार स्थिर झाले आणि गुंतवणूकदारांचा विश्वास पुनरूज्जीवित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT