नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
अंमली पदार्थ जप्त करण्यावरून दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत राजकारण तापले आहे. दिल्लीतील ड्रग्ज रॅकेटशी काँग्रेस नेत्यांचा संबंध असल्याच्या आरोप भाजपने केला होता. यानंतर भोपाळमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होताच काँग्रेसला हल्लाबोल करण्याची संधी मिळाली. काँग्रेसने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवरा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी सांगितले की, भोपाळमध्ये १ हजार ८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. भोपाळमध्ये जप्त केलेल्या ड्रग्जचा संबंध देशातील अनेक राज्यांतील ड्रग रॅकेटशी आहे. भोपाळमधील ड्रग्ज आरोपीचे उपमुख्यमंत्री जगदीश देवरा यांच्याशी संबंध असल्याचा आरोप पटवारी यांनी केला. अशा घटनांवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मोहन यादव मौन बाळगून आहेत. शासन व पोलीस प्रशासनाला सुगावाही लागला नाही. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रसने केली. देश 'उडता भारत' अर्थात अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन तरुणांचा देश होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारने संसदेत एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की देशातील सुमारे ४० कोटी लोक ड्रग्ज व्यसनी आहेत. दरवर्षी ही संख्या सुमारे २ कोटी १० लाखांनी वाढत आहे. पंतप्रधान मोदींनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत, तर दरवर्षी दोन कोटी ड्रग्ज व्यसनी निर्माण केले, असा घणाघात काँग्रेसने केला.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी दिल्लीत २ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या ड्रग्ज रॅकेटचा काँग्रेसशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली होती. आरोपी तुषार गोयल हे दिल्ली काँग्रेसच्या आरटीआय विभागाचे अध्यक्ष असल्याचा दावा करत भाजपने त्यांचे नियुक्तीपत्रही जारी केले होते. मात्र, त्यांची दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. तुषार गोयल यांचा हुड्डा कुटुंबाशी संबंध असल्याचा दावाही भाजपने केला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपनेही या मुद्द्याला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला होता.