नवी दिल्ली : धन्वंतरी जयंती आणि नवव्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठांना खास भेट म्हणून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण देण्याच्या योजनेला मंगळवारी सुरुवात केली. या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत खर्चाचे उपचार मोफत मिळणार आहेत.
उत्पन्नाचीही अट या योजनेत नाही. आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी बनवण्याचे उद्दिष्ट या योजनेमागे आहे. साडेचार कोटी कुटुंबांतील सहा कोटी वृद्धांना या योजनेचा फायदा होणार आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशवासीयांना धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वय वंदना कार्ड देण्यात येणार आहे. आरोग्याच्या क्षेत्रात ही योजना मैलाचा दगड ठरेल. दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकार या योजनेत सहभागी झालेले नाही, त्याबद्दल या राज्यांतील ज्येष्ठांची पंतप्रधान मोदींनी क्षमा मागितली. मी इच्छा असूनही तुमची मदत करू शकणार नाही, असे ते म्हणाले. अठरा राज्यांसाठी मिळून 12,850 कोटी रुपयांच्या विविध आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधान मोदींनी केले. ऋषीकेश एम्समधून देशातील पहिली हवाई रुग्णवाहिका संजीवनीही यावेळी लाँच केली.