Gambhira Vadodara Bridge Collapse News
वडोदरा :गुजरातमधील वडोदरा जिल्ह्याला आणंदशी जोडणारा नदीवरील पूल कोसळला आहे. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेमुळे अनेक वाहने नदीत काेसळली. पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना वाचवले आहे. बचाव कार्य सुरू आहे.
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील गंभीरा पूल हा मध्य गुजरातमधील महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. तो मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडतो. आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक भाग कोसळला. या दुर्घटनेबाबत ANIशी बोलताना वडोदराचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी सांगितले की, "पुलाच्या मध्यभागी १०-१५ मीटरचा स्लॅब कोसळला. पुलावर दोन वाहने अडकली. दोन ट्रक, दोन पिकअप आणि एक रिक्षा खाली नदी पात्रात कोसळले. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ९ जणांना वाचवण्यात आले आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे."
घटनेनंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गंभीरा नदीवर बांधलेल्या पुलाचा मोठा भाग कोसळल्याचे दिसून येते. त्यावर एक टँकर लटकलेला दिसत आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला एक दुचाकी लटकलेली दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूल कोसळल्याने एक ट्रक, दोन कारसह अनेक वाहने नदीत पडली आहेत.