नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्स्प्रेसवर बोलेरो आणि डंपर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला. यातील चारजण पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पहाटे पाच वाजता भरधाव वेगात असलेल्या बोलेरो गाडीने डंपरला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.
ग्रेटर नोएडा येथील जेवार टोल प्लाझाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. तर दोन जखमींवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघातग्रस्त बोलेरो गाडी आग्रा येथून नोएडाकडे येत होती. जेवार टोल प्लाजाच्या चाळीस किलोमीटर आधी बोलेरो गाडी डंपरमध्ये घुसली. गाडीत एकूण सात लोक होते, त्यातील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांपैकी चारजण बारामती येथील असून एक महिला बेळगावची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चंद्रकांत बुराडे, सुवर्णा बुराडे, मालन कुंभार, रंजना पवार आणि नुवंजन मुजावर अशी मृतांची नावे आहेत. मुजावर या हिरेकुडी, बेळगावच्या रहिवासी आहेत. तर उर्वरित बारामतीचे आहेत. नारायण कोळेकर (सातारा) आणि सुनीता गस्ते (बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्द्ल हळहळ व्यक्त केली असून मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आपण सामील असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचलंत का?