ठळक मुद्दे
गंगोत्री धामशी संपर्क तुटला
आर्मीसह एनडीआरएफ पथके बचावकार्यासाठी तैनात
पाण्यासोबत मातीचा ढिगारा सगळीकडे पसरला आहे
Uttarkashi Cloudburst
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात मंगळवारी ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) दुपारी १:४५ वाजता उत्तरकाशीतील हर्सिल येथील भारतीय लष्कराच्या कॅम्पपासून सुमारे ४ किमी अंतरावर धराली गावात ढगफुटी झाली. यामुळे भूस्खलन होऊन किमान ४ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे ५० लोक बेपत्ता आहेत. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे पवित्र गंगोत्री धामशी संपर्क तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पाण्यासोबत मातीचा ढिगारा सगळीकडे पसरला आहे. आर्मी आणि एनडीआरएफ पथके बचावकार्यासाठी तत्काळ घटनास्थळी रवाना झाली.
धराली गावात खीर गंगा नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटीची झाली. यात चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी केली आहे. लष्कर, एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांची पथके शोध आणि बचाव कार्यासाठी या भागात तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या भागात भूस्खलन झाले आहे तिथे अनेक लहान अतिथीगृहे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धराली भागातील ढगफुटीच्या घटनेबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
उत्तरकाशीतील धराली येथील या दुर्घटनेतील बाधित लोकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ''मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून मी तेथील परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचाव पथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांपर्यत मदत पोहोचवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.'' असे पीएम मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.