अहमदाबाद विमान दुर्घटना File Photo
राष्ट्रीय

Air India plane crash | एअर इंडियाच्या ‘त्या’ विमानात देखभालीच्या गंभीर त्रुटी

फाऊंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी या संस्थेच्या व्हिसलब्लोअर अहवालात दावा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन/अहमदाबाद; वृत्तसंस्था : अहमदाबाद येथे 12 जून रोजी अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 या विमानाचा मागील 11 वर्षांचा इतिहास पाहता, त्यात उत्पादन, गुणवत्ता आणि देखभालीशी संबंधित गंभीर त्रुटी होत्या, असा दावा अमेरिकेतील फाऊंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी या विमान सुरक्षा वकिली गटाने केला. या विमानावर गंभीर तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे विमान अपघाताला आता एक नवीन आणि वादग्रस्त वळण मिळाले आहे.

अमेरिकन सिनेटच्या चौकशी समितीला 12 जानेवारी रोजी सादर केलेल्या व्हिसलब्लोअर अहवालानुसार, या विमानात गेल्या दशकापासून इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये सतत बिघाड होत होते. अंतर्गत नोंदींनुसार, वीज वितरण आणि एव्हीओनिक्समध्ये वारंवार समस्या येत होत्या. एवढेच नाही, तर अपघाताच्या काही वर्षांपूर्वी एका पॉवर डिस्ट्रिब्युशन पॅनेलमध्ये आग लागल्याची घटनाही घडली होती, ज्यानंतर एक मोठा घटक बदलण्यात आला होता.

भारतीय तपास यंत्रणांनी सुरुवातीला हा अपघात वैमानिकाच्या चुकीमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला होता. इंजिनची शक्ती कमी होण्यामागे कॉकपिटमधील कृती कारणीभूत असल्याचे प्राथमिक निष्कर्षात म्हटले होते. मात्र, अमेरिकन संस्थेच्या मते, केवळ वैमानिकावर दोष न ठेवता विमानातील जुन्या तांत्रिक समस्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

बोईंग 787 च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या अहवालाने केवळ एअर इंडियाच नव्हे, तर जगभरातील बोईंग 787 ड्रिमलायनर ताफ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विमानांच्या इलेक्ट्रिकल आणि सिस्टीम विश्वासार्हतेबाबत हजारो दोष अहवाल नोंदवले गेले आहेत. दरम्यान, बोईंग आणि एअर इंडियाने यावर सावध प्रतिक्रिया दिली असून, अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे.

1. तांत्रिक बिघाड : अपघाती विमानात गेल्या 11 वर्षांपासून इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये वारंवार दोष निर्माण होत होते.

2. गंभीर आरोप: अमेरिकन संस्थेचा दावा आहे की, विमानाचे उत्पादन आणि देखभाल करण्याच्या पद्धतीत मोठ्या त्रुटी होत्या.

3. जुना इतिहास : अपघातापूर्वी काही वर्षांपूर्वी याच विमानातील एका पॉवर पॅनेलला मोठी आग लागली होती.

4. जागतिक तपास : केवळ एअर इंडियाच नाही, तर जगभरातील बोईंग 787 विमानांच्या सुरक्षा मानकांची फेरतपासणी करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT