पुढारी ऑनलाईन डेस्क
माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीति सूदन (Preeti Sudan) ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नव्या अध्यक्ष असणार आहेत. प्रीति सूदन यांनी स्वतः ANI वृत्तसंस्थेशी बोलताना याची पुष्टी केली आहे. प्रीति सूदन ह्या १९८३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या आता मनोज सोनी यांची जागा घेणार आहेत. त्या १ ऑगस्टपासून कार्यभार सांभाळतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी नुकताच त्यांचा कार्यकाळ संपण्याअगोदर राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता, परंतू ५ वर्ष अगोदर त्यांनी राजीनामा दिला. देशभरात पूजा खेडकर प्रकरण जोरदार चर्चेत असताना यूपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. मात्र सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून त्याचा पूजा खेडकर प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले होते.
मनोज सोनी हे २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर आता त्यांनी राजीनामा दिला.
प्रीति सूदन ह्या आंध्र प्रदेश कॅडरच्या १९८३ च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये संपला होता. त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाशिवाय संरक्षण मंत्रालयातही काम केले आहे. त्या आंध्र प्रदेशात वित्त, योजना, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि कृषी विभागाच्या प्रभारी होत्या. प्रीति सूदन यांनी जागतिक बँकेत सल्लागार म्हणूनही काम केले आहे. प्रीती सुदन यांनी देशात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' आणि 'आयुष्मान भारत' हे दोन प्रमुख कार्यक्रम सुरू करण्यासाठी योगदान दिले आहे