West Bengal | नेपाळला पळून जाताना तृणमूलच्या नेत्याला अटक 
राष्ट्रीय

West Bengal | नेपाळला पळून जाताना तृणमूलच्या नेत्याला अटक

फाल्टा पोटनिवडणुकीतील उमेदवार; हायकोर्टने दिलासा नाकारला

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पश्चिम बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) माजी आमदार जहांगीर खान यांना सोमवारी अटक केली. फाल्टा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकी दरम्यान कथित गैरप्रकारांमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. निवडणूक प्रक्रियेत अनियमिततेच्या तक्रारींनंतर या मतदारसंघात फेरमतदान घेण्यात आले होते. जहांगीर यांच्या समर्थकांनी महिलांना सामूहिक बलात्काराची धमकी दिली होती, असे सांगितले जाते.

जहांगीर खान यांच्याविरोधात दाखल केलेल्या पाच गुन्ह्यांमध्ये अटकेपासून संरक्षण देण्यास कलकत्ता हायकोर्टने नकार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायमूर्ती पार्थसारथी चटर्जी यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने अंतरिम संरक्षणाची मुदत वाढविण्यास नकार देत प्रकरण नियमित खंडपीठाकडे वर्ग केले होते.

निवडणुकीआधी अंतरिम संरक्षण

फाल्टा मतदारसंघात २१ मे रोजी फेरमतदान होणार असल्याने न्या. सौगत भट्टाचार्य यांनी २६ मेपर्यंत जहाँगीर खान यांना अंतरिम संरक्षण दिले होते. पोलिसांकडून वारंवार गुन्हे दाखल करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकारने हे संरक्षण रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, संरक्षणाची मुदत संपण्यापूर्वी न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

मतदानाच्या ४८ तास आधी माघार

वाद वाढत असताना जहांगीर खान यांनी मतदानाच्या अवघ्या ४८ तास आधी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्याने त्यांचे नाव मतदान यंत्रांवर कायम राहिले होते. फेरमतदानादरम्यान केंद्रीय सुरक्षा दलांच्या कडक बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. फेरमतदानात भाजपचे उमेदवार देबांग्शु पांडा यांनी १ लाख ९ हजार २१ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला.

‘पुष्पा’ प्रतिमेमुळे चर्चेत

प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जहांगीर खान यांनी स्वतःची तुलना ‘पुष्पा’ चित्रपटातील मुख्य पात्राशी केली होती. त्यावरून सुवेंदू अधिकारी यांनी फाल्टा येथील सभेत खान यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘‘कुख्यात गुन्हेगार असलेल्या कथित ‘पुष्पा’चा बंदोबस्त मी स्वतः करणार,’’ असा इशारा त्यांनी दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT