Urjit Patel
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (IMF) भारताचे कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळाला मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अर्थतज्ज्ञ आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत, यापैकी जे आधी असेल, तोपर्यंत त्यांची ही नियुक्ती असेल.
डॉ. पटेल यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये रघुराम राजन यांच्यानंतर आरबीआयचे २४ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी 'वैयक्तिक कारणास्तव' आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे ते चर्चेत आले होते. १९९० नंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे ते पहिले आरबीआय गव्हर्नर ठरले होते.
आरबीआय गव्हर्नर होण्यापूर्वी त्यांनी बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्याकडे मौद्रिक धोरण, आर्थिक धोरण संशोधन, सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन, ठेव विमा, संवाद आणि माहितीचा अधिकार यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. विशेष म्हणजे, डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिने बाकी असताना, मे महिन्यात सरकारने त्यांना पदावरून दूर केले होते. त्यांच्या जागी आता डॉ. पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या आर्थिक धोरणाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक अनुभवी चेहरा मिळाला आहे.