राष्ट्रीय

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या मुलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी, तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Pudhari News

कोलकाता; पुढारी ऑनलाईन: पश्चिम बंगालच्या राजकारणात आज काँग्रेस पक्षाला धक्का बसला. ज्येष्ठ नेते अभिजित मुखर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अभिजित हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आहेत.

कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलचे नेते पार्थ चटर्जी यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पार्थ चटर्जी म्हणाले की, अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही भावना त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे व्यक्त केली होती.  आम्ही त्‍यांचे पक्षात स्वागत करतो, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच नेते तृणमूलमध्ये सामील होत आहेत. नुकतीच मुकुल रॉय यांनी भाजपला साेडचिठ्‍ठी देत घरवापसी केली.

टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिजित मुखर्जी म्हणाले, ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे भाजपची जातीय लाट रोखली, त्यावरून मला खात्री आहे की, भविष्यात त्या इतरांच्या मदतीने देशभरात हे शक्य करू दाखवतील. 

काँग्रेसमध्ये मी प्राथमिक सभासदच होतो. तिथं कोणत्याही गटामध्ये किंवा पदावर कार्यरत नव्हतो. त्याचप्रकारे मी तृणमूलमध्ये एक सैनिक म्हणूनच कार्यरत असेन. पक्षाच्या निर्देशानुसार मी काम करीन. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता कायम राखण्यासाठी मी झोकून देवून कार्यरत राहीन. 

बनावट लसी प्रकरणात अभिजीत बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या चुकीच्या कृतीसाठी पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरणे योग्य नाही. जर तसे असेल तर मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या खटल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जबाबदार धरता येईल.

SCROLL FOR NEXT