नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा: देशातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आणि कुटुंबीय उपस्थित होते. जवळपास तासभर झालेल्या या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. (Shivraj Patil-Chakurkar visit PM Modi)
या भेटीबाबत बोलताना डॉ. अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या की, शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासमवेत पंतप्रधानांची झालेली ही सदिच्छा भेट आम्हा सर्वांना ऊर्जा देणारी ठरली. शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसभेचे सभापती असताना केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पंतप्रधान मोदींनी आवर्जून उल्लेख केला. या भेटीत त्यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने नवीन संसद भवनाची निर्मिती व व्याप्ती, लोकसभा मतदारसंघाचे होवू घातलेले परिसीमन, महिलांचा राजकारणातील सहभाग, सौर ऊर्जा मिशन, एक देश एक निवडणूक, महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा झाली. भारतातील पुरातन मंदिर स्थापत्य, शिल्प, लेण्या, निसर्ग संपदा आणि जैविक विविधता तसेच सांस्कृतिक व लोककलांच्या समृध्द परंपरेला जगासमोर प्रभावीपणे मांडणे आणि जगभर पर्यटन क्षेत्रात भारताची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी पंतप्रधानाची भूमिका अत्यंत प्रभावी वाटल्याचेही अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या. (Shivraj Patil-Chakurkar visit PM Modi)
डॉ. चाकूरकर म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचे धोरण आहे. या कायद्याद्वारे दहावीपर्यंतचे शिक्षण म्हणजे ६ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत देण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. त्याला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, यावेळी पंतप्रधानांना लातूर भेटीचे निमंत्रणही दिले. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीत कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा झाली. याप्रसंगी उपस्थित माझी मुलगी रुषिका, रुद्राली आणि जावई कुशाग्र सिंह यांच्यासोबत डिजिटल इंडिया आणि कायदा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यासंदर्भात चर्चा केल्याचेही त्या म्हणाल्या.