नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे अल्प आजारपणामुळे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी जगमोहन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जगमोहन यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादावर जगमोहन यांनी राज्यपाल असतानाच्या काळात कठोर भूमिका घेतली होती.
25 सप्टेंबर 1927 रोजी जन्मलेले जगमोहन मल्होत्रा जगमोहन या नावाने प्रसिद्ध झाले होते. माजी सरकारी अधिकारी असलेल्या जगमोहन यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला होता. दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. 1984 ते 1989 तसेच जानेवारी ते मे 1990 असे दोनवेळा त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी ते लोकसभेत निवडून गेले होते. त्यावेळी नगरविकास तसेच पर्यटन खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 1971 साली जगमोहन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर 1977 साली पद्मभूषण तर 2016 साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.