नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जागतिक व्यापार अस्थिरतेतही भारताने जगभरातील गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे. गत सहा महिन्यांत 51 अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक आकर्षिक झाली असल्याची माहिती ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’ (डीपीआयआयटी) चे सचिव अमरदीपसिंग भाटिया यांनी दिली.
‘डीपीआयआयटी’च्या वतीने स्टार्टअपला बळ देण्यासाठी येत्या 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसानिमित्त 75 महाआव्हानांचा सामना नवउद्योजकांना करावा लागेल. नवकल्पना आणि उद्योगांना भेडसावणार्या अडचणींवर कल्पक उत्तर देऊ शकणार्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. या महोत्सवाची माहिती देताना भाटिया यांनी ‘एफडीआय’मधील गुंतवणुकीचा आढावा घेतला.
राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तीन हजारांहून अधिक प्रस्ताव आले आहेत. यावेळी देशातील 20 स्टार्टअपला गौरविण्यात येणार आहे. देशातील उत्पादन क्षेत्राचा विस्तार करण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे. उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होत असून, नवीन उत्पादनांवरही भर दिला जात आहे, असे भाटिया यांनी स्पष्ट केले.
जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी (2025-26) भारताच्या ‘जीडीपी’वाढीचा अंदाज 7.2 टक्के इतका वर्तवला आहे. जून महिन्यातील अंदाजाच्या तुलनेत यात 0.9 टक्क्याने वाढ करण्यात आली असून, देशांतर्गत मागणी आणि कर सुधारणा ही या वाढीमागील मुख्य कारणे असल्याचे बँकेने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची आशादायक वाटचाल हेही विदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढल्याचे प्रतीक मानले जात आहे. तसेच, ‘ट्रम्प टॅरिफ’नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने सुरू असल्यामुळे विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत चालल्याचे दिसत आहे.