नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची आरोग्यव्यवस्था सरकारी हॉस्पिटल आणि आरोग्यसेवा देणार्या कुटुंबांच्या हाती होती. गेल्या काही वर्षांपासून देशातील बड्या हॉस्पिटल चेनमधील मोठा हिस्सा विदेशी गुंतवणूक कंपन्यांनी घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे देशाचे आरोग्य विदेशी कंपन्यांच्या हाती गेले आहे.
देशाची आरोग्य बाजारपेठ तब्बल 80 अब्ज डॉलरची आहे. काही पिढीजात डॉक्टरी व्यवसाय करणारी घराणीदेखील विविध प्रदेशांत होती. मात्र 2007 मध्ये अपोलो हॉस्पिटल्समध्ये अपॅक्स पार्टनर्सने काही गुंतवणूक केली. त्यानंतर हॉस्पिटल्समध्ये संस्थात्मक गुंतवणूक वाढू लागली.
कोव्हिड-19 नंतर हॉस्पिटलमध्ये खासगी विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होण्यास सुरुवात झाली. त्यात सिंगापूरची टेमासेक, अमेरिकेतील टीपीजी, ओन्टॅरिओ टीचर्स पेन्शन प्लॅन (ओटीपीपी) आणि केकेआर या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढली आहे.अलीकडच्या काळामध्ये ब्लॅकस्टोन कंपनीने केआयएमएस केरळमधील 80 टक्के आणि केअर हॉस्पिटल्समधील 73 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. टेमासेकने मणिपाल हॉस्पिटलमधील 59 टक्के हिस्सा खरेदी केला आहे.