आसाममधील पूरस्थिती गंभीर,मृतांचा आकडा ६४ वर  File Photo
राष्ट्रीय

Assam flood | आसाममधील पूरस्थिती गंभीर,मृतांचा आकडा ६४ वर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे येथील जवळपास २४ लाख लोक प्रभावित झाले आहेत. अनेक नद्या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत पाऊस आणि पुरांशी संबंधित घटनांमधील मृतांचा आकडा ६४ वर पोहोचल्याची नोंद झाली आहे. १० जूनपासून आसामला प्रभावित करणारी ही दुसरी गंभीर पुरस्थिती आहे.

३,५३५ गावांमधील सुमारे २३.९ लाख लोक प्रभावित

आसाममधील पुराने ३,५३५ गावांमधील सुमारे २३.९ लाख लोक प्रभावित झाले आहेत. तर ५० हजारांहून अधिक लोकांनी राज्यातील निवारागृहात आश्रय घेतला आहे. धुबरी जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील सुमारे ७.९५ लाख अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. कचर आणि दरांगमध्ये प्रत्येकी सुमारे १.४० लोक प्रभावित झाले आहेत.

बराक नदी धोक्याच्या पातळीबाहेर

ब्रह्मपुत्रा आणि बराक या प्रमुख नद्यांमध्ये जोरहाट ते धुबरीपर्यंत पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, करीमगंज शहरातील एपी घाट, बीपी घाट आणि कुशियारा येथे बराक नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे.

६८,७६८ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली

याव्यतिरिक्त बुर्हिदेहिंग, डिखौ, डिसांग, धनसिरी, जिया भराली, कोपिली आणि संकोश या नद्यांनाही पूर आला आहे. पुरामुळे सुमारे ६८,७६८ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

पार्कमधील ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू

काझीरंगा नॅशनल पार्क (KNP) मध्ये पुरामुळे ६ गेंड्यांसह ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये यंदा पुरामुळे प्राण्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT