नवी दिल्ली : पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. पंजाबमधील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानंतर 1,018 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि पावसामुळे राज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत.
प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत 11 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. रावी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने गुरुदासपूर जिल्ह्यातील घोणेवाले येथील धुस्सी बंधारा फुटला. यामुळे पुराचे पाणी सुमारे 15 किलोमीटर दूर असलेल्या अजनाला शहरापर्यंत पोहोचले असून, 80 गावे पाण्याखाली गेली आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही पावसाने भीषण रूप धारण केले आहे. रियासी जिल्ह्यातील बदर गावात शनिवारी सकाळी झालेल्या भूस्खलनाच्या ढिगार्याखालून आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढले. रामबनच्या राजगड परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला बेपत्ता आहे.
सततच्या पावसामुळे कटरा येथील वैष्णोदेवी यात्रा गेल्या 6 दिवसांपासून थांबवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे 18 जिल्ह्यांमध्ये पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत पावसामुळे 774 घरे कोसळली आहेत. बलियामध्ये गंगेच्या किनार्याची वेगाने धूप होत असून, गेल्या 24 तासांत चक्की नौरंगा आणि भगवानपूर भागातील 24 घरे गंगेच्या पात्रात विलीन झाली आहेत.