नवी दिल्ली : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन या महिन्याच्या अखेरीस धावण्यास सुरुवात होईल. पहिली ट्रेन दिल्ली ते कटरा (जम्मू-काश्मिर) दरम्यान असेल. या गाडीचा वेग ताशी १३० किलोमीटर असेल. वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १८० किलोमीटर एवढा आहे. मात्र स्लीपर कोच असल्याने या गाडीचा वेग कमी असेल. पहिली ट्रेन येत्या २६ जानेवारीला धावू शकते.
ही नवी गाडी पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे ही गाडी तयार करण्यात आली आहे. यामध्ये उत्तम वातानुकूलित सेवा, यूएसबी पोर्ट, पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र जागा आणि आधुनिक सुविधा असतील, या सुविधांसह ब्लॅक बॉक्स, उत्तम क्रॅश प्रोटेक्शन आणि अत्याधुनिक आगरोधक प्रणालीसह सुरक्षेला यात प्राधान्य देण्यात आले आहे.
या ट्रेनमध्ये स्लीपर बर्थ जोडले गेले आहेत, जे मूळतः वंदे भारत चेअर कारसाठी तयार केले आहेत. अधिक पाणी साठवण्यासाठी या ट्रेनच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. या बदलांमुळे कोचचे वजन वाढले असून त्याचा वेगावर परिणाम होणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण १६ डब्यांसह ८२३ प्रवासी बर्थ आहेत. १६ डब्यांमध्ये ११ डबे तृतीय श्रेणी वातानुकूलित, ४ डबे द्वीतीय श्रेणी वातानुकूलित आणि १ डबा प्रथम श्रेणी वातानुकूलित आहे. प्रथम श्रेणीतील प्रवाशांना शॉवरची सुविधा आहे. ट्रेनमध्ये भारतीय आणि पाश्चात्य पद्धतीचे आधुनिक शौचालय आहेत. स्वच्छता राखण्यासाठी, प्रत्येक डब्यात बायो-डायजेस्टर टँक आणि ३० लिटर क्षमतेच्या कचरा पेट्या देण्यात आल्या आहेत.