पंतप्रधान नरेंद्र मोदी  (file photo)
राष्ट्रीय

१० वर्षात पहिल्यांदाच परकीय हस्तक्षेपाशिवाय संसदीय अधिवेशनाला सुरुवात: पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi | ‘पुढील २५ वर्षे समृद्ध आणि विकसित भारत साध्य करण्यासाठी समर्पित असतील’

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा

मागच्या १० वर्षात पहिल्यांदाच कोणत्याही परकीय हस्तक्षेपाशिवाय संसदीय अधिवेशन सुरु होत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला. प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला परकीय ताकदीकडून आग लावण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला देशातील काही लोक हवा देतात. २०१४ नंतर कदाचित हे पहिले संसदीय अधिवेशन असेल जिथे अधिवेशनापूर्वी परकीय ताकदीकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी संसद परिसरात माध्यमांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पुढील २५ वर्षे समृद्ध आणि विकसित भारत साध्य करण्यासाठी समर्पित असतील. सरकार भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने मिशन मोडमध्ये पुढे जात आहे. सर्व राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम केले पाहिजे, लोकसहभागामुळे परिवर्तन घडेल, असे मोदी म्हणाले. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीयांवर देवी लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थना केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०४७ पर्यंत, जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा देश विकसित देश बनण्याचे आपले ध्येय साध्य झालेले असेल. नवोपक्रम, समावेशकता आणि गुंतवणूक हे देशाच्या आर्थिक रोडमॅपचा पाया आहे. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयक आणि प्रस्तावांवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे राष्ट्राला बळकटी देणारे कायदे तयार होतील. धार्मिक आणि सांप्रदायिक भेदांपासून मुक्त राहून प्रत्येक महिलेसाठी समान हक्क प्रदान केले पाहिजेत, असे ते म्हणाले. हे ध्येय साध्य करण्यासाठी या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले.

आजचे तरुण विकसित भारताचे लाभार्थी असतील

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जे तरुण २०-२५ वयोगटातील आहेत, ते ४५-५० वर्षांचे झाल्यावर विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी असतील. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न सध्याच्या किशोरवयीन आणि तरुण पिढीसाठी एक महत्त्वाची भेट असेल. त्यांनी याची तुलना १९३० आणि १९४० च्या दशकात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या तरुणांशी केली, ज्यांच्या प्रयत्नांमुळे २५ वर्षांनंतर स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व खासदारांना विकसित भारताचे स्वप्न बळकट करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. तरुण खासदारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT