पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये सोमवारी (दि.28) संशयित दहशतवाद्यांच्या गटाने लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या लष्कराकडून जम्मू जिल्ह्यातील परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम सुरू आहे. (J & K Terrorist Attack)
बटाल परिसरात सकाळी ७ वाजता तीन दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर तीन वेळा गोळीबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला आहे आणि शोध सुरू केला. जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांनी दिवाळी सणाच्या हंगामाच्या तयारीसाठी जम्मू प्रदेशात विस्तृत सुरक्षा उपाय लागू केल्यामुळे ही घटना घडली. मागील महिन्याभरात अनेकवेळा गोळीबार झाला आहे. यामध्ये दोन सैनिकांसह किमान 12 लोक मारले गेले आहेत.
मागील आठवड्यातच बारामुलामधील गुलमर्गजवळ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला, यामध्ये दोन सैनिक आणि कुली मारले. याबरोबरच 20 ऑक्टोबर रोजी, गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग येथे एका बांधकाम साइटवर दहशतवाद्यांनी डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांसह सात जणांची हत्या केली. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी बिहारमधील आणखी एका परप्रांतीय कामगारावर हल्ला झाला होता. या वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या घरी उच्चस्तरीय बैठक झाली. (J & K Terrorist Attack)