Kangana Ranaut File Photo
राष्ट्रीय

Kangana Ranaut: 'रहस्यमय परदेशी व्यक्ती...' सोनिया गांधींबाबतची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट भोवली; कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल

गांधी कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी भाजप खासदार कंगना रणौत यांच्या विरोधात हिमाचल प्रदेश पोलिसांनी सिमला येथे एफआयआर नोंदवला आहे.

मोहन कारंडे

सिमला: 'एक रहस्यमय परदेशी व्यक्ती (सोनिया गांधी) आल्यानंतर सासू आणि पतीची एकापाठोपाठ एक हत्या झाली' अशी आक्षेपार्ह सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी भाजप खासदार कंगना रणौत यांच्या विरोधात सिमला येथे एफआयआर नोंदवला आहे. गांधी कुटुंबाला लक्ष्य करून त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्समुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते आणि त्या प्रक्षोभक आहेत, अशी तक्रार दाखल झाल्यानंतर हिमाचल प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शुक्रवारी (दि. १३) सिमला येथील रहिवासी निवृत्त कॅप्टन अतुल शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(१)(ब), ३५३(२) आणि ३५६(२) अंतर्गत हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सिमलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले असून, या प्रकरणाचा तपास केला जाईल असे सांगितले.

आपल्या तक्रारीत शर्मा यांनी आरोप केला आहे की, १० नोव्हेंबर रोजी कंगना रणौत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या पोस्ट्समध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी व राजीव गांधी यांच्या मृत्यूबाबत अत्यंत प्रक्षोभक वक्तव्य लिहिली आहेत. तक्रारीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या उल्लेखावरही आक्षेप घेण्यात आला आहे; त्यांना या पोस्ट्समध्ये "रहस्यमय परदेशी नागरिक" असे म्हटले आहे.

शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, या पोस्ट्समध्ये असा गर्भितार्थ काढला गेला आहे की, गांधी कुटुंबातील सदस्यांच्या एकापाठोपाठ एक झालेल्या मृत्यूंच्या वेळी सोनिया गांधी परदेशातील एका कॅफेमध्ये उपस्थित होत्या आणि शेवटी त्या सत्तेच्या केंद्रस्थानी आल्या. यासोबतच "किती सोयीस्कर" अशी टिप्पणीही करण्यात आली होती.

या पोस्ट्समध्ये संजय गांधी यांच्या निधनानंतर मनेका गांधी यांना कुटुंबाच्या निवासस्थानातून बाहेर काढल्याचाही उल्लेख असल्याचे म्हटले जाते. शर्मा यांनी असा युक्तिवाद केला की, हा मजकूर केवळ राजकीय टीकेच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये शत्रुत्वाची भावना भडकावू शकतो, सामाजिक सलोखा बिघडवू शकतो आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करू शकतो.

त्यांनी असाही आरोप केला आहे की, या पोस्ट्सद्वारे दिशाभूल करणारी माहिती पसरवली गेली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये भीती किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि विविध गटांमध्ये शत्रुत्वाची भावना वाढू शकते. गुरुवारी सायंकाळी पोलीस महासंचालकांना ईमेलद्वारे पाठवलेल्या तक्रारीत, शर्मा यांनी तातडीने एफआयआर नोंदवण्याची आणि कंगना रणौत यांच्या पोस्ट्सची सायबर-फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT